ओम गणेश मंडळाचा “भुकेलेल्याना अन्न द्या” असा सामाजिक संदेश…!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दारव्हा :- गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा कायम राखत दारव्हा येथील ओम गणेश मंडळाने “भुकेलेल्याना अन्न द्या ” असा संदेश देत आगळा वेगळा आदर्श निर्माण केला.
जगात हजारो टन अन्नाची नासाडी होते, परंतु अनेक बेघर, अनाथांच्या नशीबी एकवेळचे जेवण सुद्धा नशीबी नाही. समाजातील प्रत्येक वंचित घटकाला पोटभर अन्न मिळावे या अनुषंगाने जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवून कर्मयोगी संत गाडगे महाराजांच्या दशसूत्री मधील ‘ भुकेलेल्यांना अन्न द्या ‘ या संकल्पनेवर आधारीत या वर्षी अंबिका नगर येथील ओम गणेश मंडळ यांनी भावस्पर्शी देखावा सादर केला आहे.
गणेशोत्सव दरम्यान श्री गणपती बाप्पाच्या साक्षीने काही दानशूर व्यक्तींनी स्वकीयांचा वाढदिवस तसेच आनंदाचा क्षण अन्नदान करून साजरा करण्याचा संकल्प केला. तसेच ओम गणेश मंडळाने अन्नछत्राचा उपक्रम राबवित बेघर गरजू लोकांना अन्नदान केले.
ओम गणेश मंडळाने अन्न पुरवठा निरीक्षक तुषार राठोड यांचे हस्ते पर्यावरण पूरक मूर्तीची स्थापना केली. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून परिसरात स्वच्छता व कचरा विलगीकरण बाबत प्रसार करीत आहे.नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा उपक्रम अंतर्गत नागरिकांना स्वच्छतेची शपथ देऊन सहभाग नोंदविला. पर्यावरण पूरक संदेश देणाऱ्या चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. वृक्षारोपण तसेच सीड बॉलचा उपक्रम राबविण्यात येत आहे. रात्री भजनाचा कार्यक्रम पार पाडला जातो. श्री गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्य डफडीच्या तालावर संपन्न होणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. श्री गणेश महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष जिवन काळे, उपाध्यक्ष संदिप शिले, सचिव स्वप्नील राठोड, प्रविण राऊत, विलास शिले, किशोर राऊत, अमोल ठोंबरे, रुषिकेश गोटे, निखील मडसे, अमोल राठोड, महेश दंडे, कार्तिक शिले, राजेश पराळे, हर्ष चव्हाण विधी सल्लागार ॲड. नितीन जवके, ॲड. सचिन गोरले मार्गदर्शक सुनिलभाऊ आरेकर परिश्रम घेत आहेत.
16 वर्षापासून डीजे न वाजवण्याचा संकल्प-
गणेशोत्सव म्हटले की अबाल वृद्धांच्या आनंदाला उधाण येतो. सर्वत्र आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण होते दहा दिवस बाप्पांची पूजा अर्चना भजन कीर्तन तसेच विविध उपक्रम अनेक जण राबवत असतं परंतु अनंत चतुर्थी म्हणजे बाप्पाचा विसर्जनाचा दिवस या दिवशी कर्कश्य आवाजाचे मोठ मोठे डीजे लावून मिरवणूक काढली जाते त्यामुळे वयोवृत्तांना व लहान बालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो डीजेच्या होणाऱ्या विपरीत परिणाम लक्षात घेता ओम गणेश मंडळ मागील 16 वर्षापासून डीजे विरहित गणेश उत्सव साजरा करतो आहे त्यामुळे सर्वत्र मंडळाचे कौतुक केले जात आहे.