उपमुख्यमंत्र्यांसाठी वेगळा कायदा..? कामाच्या पाहणीला दुचाकीवरून गेले, त्या गाडीवर १९००० दंड, ३४ वेळा नियमांचं उल्लंघन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री फ्लायओव्हरचं काम पाहण्यासाठी चक्क दुचाकीवरून गेले होते. त्यांच्या दुचाकीवरून पाहणीपेक्षा आता त्या दुचाकीची चर्चा होत आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हेब्बाळ फ्लायओव्हरची पाहणी करायला गेले होते.
ते ज्या दुचाकीवर गेले त्यावर तब्बल १८ हजार ५०० रुपये दंड आहे. तर वाहतुकीच्या नियमांचं ३४ वेळा उल्लंघन केलं असल्याचा आरोप भाजपने केलाय.
कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी आहे, डीके शिवकुमार यांच्यासाठी नाही का? असा प्रश्न भाजपने विचारला आहे. डीके शिवकुमार यांनी हेब्बाळ फ्लायओव्हरची पाहणी केली. याचे फोटो शेअर करत भाजपने आरोप केला आहे. या दुचाकीवर गेल्या काही वर्षांपासून जवळपास १८,५०० रुपयांचा दंड बाकी आहे. याशिवाय हाफ हेल्मेट घातल्याबद्दल ५०० रुपयांचा नवा दंडही आहे.
कर्नाटक भाजपने सोशल मीडियावर म्हटलं की, माननीय उपमुख्यमंत्री, तुमच्यासाठी एक कायदा आणि राज्यातील जनतेसाठी वेगळा कायदा आहे का? ज्या दुचाकीवरून तुम्ही जात होता त्यावर १८५०० रुपयांचा दंड बाकी आहे. आधी दंड भरा.
भाजपने यासोबत दुचाकीवर बसलेल्या डीके शिवकुमार यांचा फोटोही शेअर केलाय. यावर डीके शिवकुमार यांच्यासोबत मंत्री बैराठी सुरेश हेसुद्धा दिसून येतात. तसंच दुचाकीवर कशाबद्दल दंड आहेत याचेही काही फोटो जोडले आहेत. यात हेल्मेट न घातल्याचे दंड सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे. आता डीके शिवकुमार यांनीही हाफ हेल्मेट घालून गाडी चालवल्यानं त्या दंडाचे ५०० रुपये वाढले असून एकूण दंड १९ हजार इतका झाला आहे.