छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते काही… शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली, बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले.
छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मुर्ख होते का? असा प्रश्न संजय गायकवाड यांनी केला. लातूर जिल्ह्यातील हाडोळती या ठिकाणी संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, फक्त हिंदीचा विषय नाही, जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? तसेच शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मुर्ख होते का? असेही अपशब्द वापरले.
ठाकरे ब्रँड उरला नाही
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजय सभेच्या निमित्ताने एकत्रित आले. त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, “पंधरा वर्षांपूर्वीच ते एकत्रित आले असते तर काही फरक पडला असता. परंतु त्यांनी फार उशीर केला. आता ते एकत्रित आल्याने महाराष्ट्राला काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. ठाकरे नावाचा ब्रँड जर असता बाळासाहेब जिवंत असतानाच 288 जागा निवडून आल्या असत्या. त्यावेळीही 70-74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती. आता हे दोन भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार ना. वेळ निघून गेली आहे.”
हिंदीसह अनेक भाषा शिकल्या पाहिजेत
आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का? असा सवाल उपस्थित करून जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये असं आमदार संजय गायकवाड म्हणाले.