ठाकरे एकत्र आले ते ठिक, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण…? नितेश राणेंचा खोचक सवाल…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलंच झालं, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावला. यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर भाजपला आव्हान दिलं. त्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.
नितेश राणे म्हणाले की, “दोन कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. यांचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं.”
महापालिकेला भाजप जिंकणार, नितेश राणेंचा विश्वास
नऊ महिन्याआधीच महायुतीला लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ असा विश्वासही नितेश राणे व्यक्त केला. मुंबईतील हिंदू समाज आता यांना परत घरात बसवणार असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी कोणत्या शाळेत शिकले असा प्रश्न केला. त्यावर नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. मोदी शाळेत ज्या शाळेत शिकले त्या शाळेत शिकण्याची यांची लायकी नाही असा टोला त्यांनी लगावला.
एकट्या देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं हे महाराष्ट्राने पाहिलं. दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हिंदू विरोधी देशद्रोह्यांना सर्वात मोठा आनंद झाला असेल असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
निवडणुकीसाठी एकत्र आले, शेलारांची टीका
भाषेसाठी नाही तर निवडणुकीसाठी ही जाहीर मनधरणी होती अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. भाषेचं प्रेम वगैरे काही नाही, केवळ मुंबईची लूटमार करण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी ही धडपड आहे असं शेलार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
ठाकरेंचे मराठी प्रेम हे पुतणा-मावशीचं, दरेकरांची टीका
राज ठाकरेंविषयी उद्धव ठाकरेंना आता आलेलं प्रेम हे पुतणा मावशीचं प्रेम आहे अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. सत्ता गेल्याचं वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला अशी टीका दरेकर यांनी केली.