उद्धव ठाकरे म्हणाले, उठेगा नही साला; एकनाथ शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले, आडवे झालेल्यांनी उठण्याची भाषा करु नये..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उठण्याची भाषा कोण करतंय, त्यासाठी मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तीन वर्षांपूर्वी आपण उठाव केला, त्यातून हे आडवे झाले.
आता उठण्यासाठी कुणाचातरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी टीकाही शिंदे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग मारत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. गद्दार कायम झुकलेलेच असतात, उठेगा नही साला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं.
तीन वर्षांपूर्वी धो डाला, अब उठेगा नही साला
एकनाथ शिंदे म्हणाले की, “तीन वर्षांपूर्वी उठाव केला. त्यावेळी दाढीवरुन अर्धाच हात फिरवला होता. त्यावेळी ते आडवे झाले. त्यातून सावरले नाहीत. आता उठण्यासाठी कुणाचा तरी हात धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उठण्याची भाषा त्यांनी करू नये.”
एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने मात्र सत्तेची मळमळ बोलून दाखवली. कोणत्याही पक्षाचा झेंडा आणि अजेंडा नको असं ठरलं होतं. ते फक्त एकाने पाळलं. दुसऱ्याने मात्र स्वार्थाचा अजेंडा राबवला असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला.
राज-उद्धव यांचे मनोमिलन
एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असा नारा देत मराठीच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा आज अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एका व्यासपीठावर आले.
वरळी डोम इथे झालेल्या भव्य दिव्य मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकत्र येत गळाभेट घेतली. एल्गार मराठीचा होता पण चर्चा होती ती ठाकरेंच्या मनोमिलनाची. राज – उद्धव या ठाकरे बंधूंच्या पुढच्या पिढीने म्हणजे अमित आणि आदित्य ठाकरे यांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत, एकत्र दिलेली पोझ लक्षवेधी होती.
दोघांना एकत्र आणण्यासाठी बाळासाहेबांना जमलं नाही, अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं असा टोला राज ठाकरेंनी भाषणातून मारला, तर आमच्यातला ‘अंतर’पाट अणाजीपंताने दूर केला असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. अभूतपूर्व गर्दी झालेला, राजकारणाची पुढची दिशा बदलण्याची ताकद असलेला हा मेळावा ठाकरे ब्रँडची ताकद राजकारणाला दाखवून गेला.