तेलकट बटाटे वडे आणि चिकन सूपची आठवण झाली, ठाकरेंच्या युतीवर भाजपचा पहिला हल्ला….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठीच्या मुद्यावरून तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी विजयी मेळावा घेतला. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी मेळाव्याच्या व्यासपीठावरून दिली.
दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपकडून आता मोठी प्रतिक्रिया आली आहे. तेलकट बटाटे वडे आणि चिकन सूपची आठवण झाली असा टोमणा भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी मारला.
महाराष्ट्राला, मुंबईला हात घालून तर बघा, असा इशारा राज ठाकरेंनी मोदी-शाहांना दिला. शांत आहोत याचा अर्थ गांडू नाहीत असं त्यांनी भाजपला सुनावलं. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याआधी हिंदी भाषेच्या निमित्तानं मराठी माणूस जागा आहे की नाही हे तपासलं गेलं अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर भाजपमधून राज आणि उद्धव यांच्यावर टीका करण्यात आली.
काय म्हणाले अतुल भातखळकर?
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर एका जाहीर भाषणात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळातील भेटीचा संदर्भ दिला होता. आपल्याला फक्त तेलकट बटाटे वडे खायला दिले जातात असं बाळासाहेबांनी म्हटल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आपण बाळासाहेबांना चिकन सूप दिलं असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.
नेमक्या त्याच घटनेची आठवण भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काढली. अतुल भातखळकर यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय की, मला उगाचच तेलकट बटाटे वडे आणि चिकन सूपची आठवण झाली.
निवडणुकीसाठी एकत्र आले, शेलारांची टीका
भाषेसाठी नाही तर निवडणुकीसाठी ही जाहीर मनधरणी होती अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. भाषेचं प्रेम वगैरे काही नाही, केवळ मुंबईची लूटमार करण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी ही धडपड आहे असं शेलार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं.
ठाकरेंचे मराठी प्रेम हे पुतणा-मावशीचं, दरेकरांची टीका
राज ठाकरेंविषयी उद्धव ठाकरेंना आता आलेलं प्रेम हे पुतणा मावशीचं प्रेम आहे अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. सत्ता गेल्याचं वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला अशी टीका दरेकर यांनी केली.