मान्सूनपुर्वीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अद्ययावत ठेवा :- जिल्हाधिकारी विकास मीना :- जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्सूनपुर्व व टंचाई तयारी आढावा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.16 :- मान्सूनकाळात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन होण्यासाठी आवश्यक साधनांसह सर्व यंत्रणा आताच अद्ययावत करून घ्या. वेगवेगळ्या विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने तयारी ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपुर्व तयारी, टंचाई व उष्णतेच्या लाटांपासून सावधानता बाळगण्याबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
काही ठिकाणी टंचाई निवारणासाठी पाणी सोडणे आवश्यक असते. अशी मागणी असलेल्या ठिकाणी पाणी सोडण्याबाबत वेळीच नियोजन केले जावे. उष्णतेच्या लाटेपासून सावधानता बाळगण्याबाबत नागरिकांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करावे. उन्हाळ्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मजूरांची संख्या आहे, तेथे बचावाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
मान्सून काळात पुरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. अशी संभाव्य गावे निश्चित करण्यात यावी. वारंवार पुरस्थिती संभवणाऱ्या गावातील नागरिकांना आताच पुरेशा सूचना देण्यात यावे. पुरस्थिती उद्भवल्यास कराव्या लागणाऱ्या आवश्यक उपाययोजना तयार ठेवावे. आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक साधणे, शोध व बचाव पथकांचे प्रशिक्षण पुर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आपत्कालीन परिस्थिती निर्मुलनासाठी वेगवेगळ्या विभागांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
शंभर दिवस कार्यक्रमाचा आढावा
राज्य शासनाच्यावतीने कार्यालये व शासकीय कामकाज सुधारणांसाठी शंभर दिवस सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांतर्गत विविध विभागांद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कार्यक्रमांतर्गत शासनाने विहित केलेल्या प्रत्येत मुद्यावर उत्तमप्रकारे कार्यवाही करून आपले कार्यालय यात अव्वल कसे राहील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.