कोरोनाबाधित पत्रकारास तीन डॉक्टरांकडून अश्लील शिविगाळ ; कोव्हीड केंद्रातून बाहेर हाकलण्या प्रयत्न ; महागाव तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णास, यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील असोलेशन वार्डात ड्युटीवरील तीन डॉक्टरांनी अत्यंत अमानुष वागणूक दिल्याचा धक्कादायक व्हिडियो दस्तुरखुद रुग्णाने सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पत्रकार असलेल्या या रुग्णाने यवतमाळ येथील कोव्हीड केंद्रात खोकल्याची मुदतबाह्य औषधी रुग्णांना देण्यात येत असलेला व्हिडीओ व्हायरल केला होता. शिवाय येथील जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरते बद्दल माहिती फोटोसह सोशल मीडियावर टाकली होती. या एकूणच प्रकाराने आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेल्यामुळे शासकीय रुग्णालयाच्या कोव्हिड केंद्रात कर्तव्यावर असलेल्या तीन डॉक्टरांनी या कोरोनाग्रस्त रुग्णासोबत असभ्य वर्तणूक केली. शिवीगाळ करीत कोव्हिड केंद्रातून पसारा घेऊन बाहेर जाण्याची धमकी दिली. कोरोनाग्रस्त असलेला हा पत्रकार महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील रहिवासी असून सध्या पुसद येथे राहतो. त्याच्यासोबत डॉक्टरांनी केलेल्या असभ्य वागणुकीबद्दल महागाव आणि पुसद तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. महागाव तालुका पत्रकार संघाने या घटनेचा निषेध करीत दोषी डॉक्टरांवर कारवाई आणि रुग्णास योग्य उपचार देण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष गजानन वाघमारे, उपाध्यक्ष रितेश पुरोहित, सचिव रवी कावळे, संजय पाटे,गजानन साबळे,संजय नरवाडे,ज्ञानेश्वर ठाकरे, रियाज पारेख,विनोद कोपरकर, फराज खान पठाण, उमेश गाडे व अन्य पत्रकार उपस्थित होते.