मोदींनी लोकसभेला 16 ठिकाणी सभा घेतल्या 13 ठिकाणी पराभव झाला, देशातील जनतेनं संविधान बदलाचा डाव ओळखला : शरद पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंगापूरमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं. गंगापूरमध्ये शरद पवार यांनी सतिश चव्हाण यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधान बदलण्याचा डाव देशातील नागरिकांनी ओळखल्याचं ते म्हणाले. राज्यातील मतदारांनी इतिहास केला त्यामुळं मोदी चारशे पार जाऊ शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
लोकसभेची निवडणूक पाच सहा महिन्यांपूर्वी झाली. देशात चित्र वेगळं होतं. नरेंद्र मोदी सांगत होते कमीत कमी चारशे जागा द्या, त्यांचे सहकारी चारशे जागा मागत होते, ते राजस्थानचे असो उत्तर प्रदेशचे असो, कर्नाटकचे असो, भाजपच्यावतीनं मत मागायला जनतेपुढं जात होते त्यांची मागणी चारशेची होती. चारशेचा आकडा यासाठी देशाची घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली होती. त्यात बदल करण्याचा डाव मोदी आणि भाजपचा होता. मोदींचं धोरण देशाच्या हिताचं नाही हे लक्षात आल्यावर ठिकठिकाणी त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. मोदी महाराष्ट्रात 16 ठिकाणी आले त्यातील 13 ठिकाणी त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 1 जागा आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. कालच्या निवडणुकीत भाजपचा संविधान बदलाचा डाव राज्यातील नागरिकांनी ओळखला आणि मविआचे 31 खासदार निवडून देत इतिहास निर्माण केला. त्यामुळं मोदींना 400 जागा मिळू शकल्या नाहीत, त्यामुळं घटनेत बदल करु शकले नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, सोयाबीन, ऊस, ज्वारी याच्या किंमती घसरल्या आहेत. जे जे बळीराजा पिकवतो त्याच्या किंमती मोदींच्या राजवटीत कमी झाल्या आहेत. लोकसभेची निवडणूक संपली आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आहे. आमचा प्रयत्न आहे काही झालं तरी ज्यांच्या हातात आज महाराष्ट्राची सत्ता आहे पुन्हा त्यांच्या हातात राहू नये, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांकडे सत्ता द्यायची नाही : शरद पवार
गेल्या नऊ महिन्यांमध्ये 950 शेतकऱ्यांनी महाराष्ट्र मध्ये आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या का करत आहेत. शेतकऱ्यांनी घाम गाळला, खर्च केला पण त्याच्या उत्पादनातून खर्च निघत नाही, तो कर्जबाजारी होतो, घरादाराचा लिलाव होतो, समाजात अप्रतिष्ठा होतो, त्यामुळं शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात, असं शरद पवार म्हणाले. मी कृषी मंत्री असतांना यवतमाळ येथे शेतकरी आत्महत्या झाली, अशी माहिती मिळाली. यानंतर अस्वस्थ झालो, त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कानावर गोष्ट घातली. ते आणि मी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्याच्या घरी गेलो. तिथं त्या शेतकऱ्याची पत्नी ढसाढसा रडत होती, तिचे अश्रू थांबत नव्हते. कपाशीचं पीक घेतलं होतं, खतं औषध घातली पण पिकावर रोग आला अन् पीक उद्धवस्त झालं अन् काढलेलं कर्ज तसंच राहिलं, दुसऱ्या वर्षी तिच स्थिती राहिली, यातून नवरा कर्जबाजारी झाला. सावकारांनी आणि बँकांनी लिलाव काढल्यानंतर ती गोष्ट सहन झाली नाही, त्यामुळं त्या शेतकऱ्यानं जीवन संपवलं अशी माहिती त्याच्या पत्नीनं दिली, असं शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही दिल्लीत जाऊन निकाल घेतला. देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज आम्ही माफ करुन टाकलं, शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढलं, आज तशाच निर्णयाची आवश्यकता आहे, असं शरद पवार म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा निकाल घ्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले. भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेतली पाहिजे, खोटी आश्वासन देणे हेच यांचे उद्योग आहेत त्यांच्या हाती सत्ता द्यायची नाही हा निकाल घ्यावा लागेल, असं शरद पवार म्हणाले. सतिश चव्हाण यांना विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.