“तीच्यावर पक्षाचा फार जीव”, शिलवंत यांचं तिकीट कसं कापलं..? अजित पवारांनी सगळं सांगितलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत- धर यांची २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी कशी कापण्यात आली, याबाबतचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पिंपरी- चिंचवड मध्ये पार पडलेल्या महायुतीच्या बैठकीत केला.
याच विधानावरून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत- धर यांनी अजित पवारांवर नाराजी व्यक्त करत शेलक्या शब्दांत टोला लगावला आहे.
“लाडकी बहीण योजना राबविण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सन्मान दिला असता तर आणखीनच कळवळा आला असता.” असं प्रत्युत्तर शीलवंत यांनी अजित पवारांना दिलं आहे. त्या पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. अजित पवारांनी केलेल्या या विधानानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे यांना सुलक्षणा शीलवंत- धर यांचं आव्हान असणार आहे.
सुलक्षणा शिलवंत- धर म्हणाल्या, “२०१९ ला गुणवत्ता बघून तिकीट मिळालं होतं. अजित पवारांनी सांगितलं असतं की तू थांब, आपल्याला सुशिक्षित उमेदवाराची गरज नाही. मी नक्कीच थांबले असते. मी नक्कीच तुमचं ऐकलं असतं. अजित पवारांनी बैठकीत अशा पद्धतीने वक्तव्य करायला नको होतं. अजित पवारांच्या या वक्तव्याचा जनता नक्की बोध घेईल.” अशा शब्दांत शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत – धर यांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे.
नेमकं अजित पवार काय म्हणाले होते?
२०१९ मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांना कसं तिकीट देण्यात आलं, आत्ताच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत- धर यांचं तिकीट कसं कापण्यात आलं याबाबत अजित पवारांनी खुलासा केला. शरद पवार गटाच्या आत्ताच्या उमेदवार यांना आमच्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. पक्षाचं फारच शीलवंत यांच्यावर प्रेम होतं, ते का कुणास ठाऊक. असं म्हणत अजित पवारांनी अनेकांचे फोन आल्याने त्यांचं तिकीट कापून ऐनवेळी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मुकाई चौकात अण्णा बनसोडे यांना एबी फॉर्म देऊन तो सकाळी अकराच्या सुमारास भरण्यास सांगितला होता. त्यानंतर अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभेतून विजयी देखील झाले होते, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.