‘भारत जोडो’तून अराजक पसरवण्याचे काम ; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर टीका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा बहुसंख्य कडव्या डाव्या विचारांच्या संघटना, व्यक्ती सहभागी आहेत. ही मंडळी आणि त्यांच्यामार्फत राहुल गांधी हे देशात अराजक पसरवत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे माध्यमांशी बोलताना केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान म्हटले, की वास्तविक निळ्या रंगाचे स्मरण होत असताना राहुल गांधी हातात लाल रंगाचे संविधानाचे पुस्तक घेऊन फिरत आहेत. या साऱ्यातून त्यांना काय सुचवायचे आहे ते स्पष्ट होत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी फडणवीस येथे आले आहेत. आज ते माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन रंगले जात असताना फडणवीस यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. फडणवीस म्हणाले, की ‘भारत जोडो समूहा’मध्ये अनेक संघटना कडव्या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. नागरी नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. नागरी नक्षलवाद म्हणजे लोकांची मने कलुषित करण्याचा प्रकार. त्यांच्यामध्ये अराजकतेचे एक रोपण करायचे, जेणेकरून देशातील संस्था, यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल.
भारत जोडो आंदोलन, संसदेचे अधिवेशन अशा ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी हातात लाल रंगाचे संविधानाचे पुस्तक घेऊन फिरत आहेत. यावरून फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येत असलेले गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले.
संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा संदर्भ देताना ते कायम निळ्या ऐवजी लाल रंगातील संविधानच दाखवतात. लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही अराजक पसरवत आहात, असा आरोप फडणवीस यांनी केला.