उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा वचननामा जाहीर, छत्रपती शिवरायांचं मंदिर, मोफत शिक्षण आणि काय काय वचनं?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पक्षाने त्यांच्या पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये हा वचननामा काय आहे ते सांगितलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“काही दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होईलच पण काही बारीक-सारी गोष्टी अशा आहेत. ज्या शिवसेनेच्या वचननाम्यात दिल्या आहेत. आम्ही युतीत होतो तेव्हाही वचननामा आणला होता. तसाच आता महाविकास आघाडीत असतानाही आमचा वचननामा आणला आहे. त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळी भूमिका घेतली असं मुळीचं नाही असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे आणि गावठाण त्यामध्ये कोळी बांधव आले काही गावठाण यांच्याकडे आता सरकारची वाकडी नजर गेलेली आहे. या कोळीवाड्यांच्या क्लस्टर विकास किंवा डेव्हलपमेंट करण्याचं घाट त्यांनी घातलेला आहे. क्लस्टर म्हणजे काय ते सगळं एकत्रित करायचं त्यांना टॉवर बांधून द्यायचे आणि बाकीची जमीन ही त्यांच्या मित्राला त्याच्या घशात घालायची असा हा एक काळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे पहिला प्रथम त्यांनी केलेला जीआर आहे तो रद्द करू कोळीवाड्यांचं अस्तित्व यांची ओळख हे आम्ही कदापी पुसू देणार नाही. या सर्वांना मान्य होईल असाच विकास आम्ही त्या ठिकाणी करू” असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे.
धारावीबाबतचा सरकारचा डाव हाणून पाडणार
धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर एक बकालपणा आणण्याचा सरकारचा डाव आहे. तो देखील आम्हाला हाणून पाडायचा आहे आणि तो आम्ही हाणून पाडणार. धारावीमध्ये चार-पाच लाख वस्ती असेल त्यातली अर्धी अधिक हे अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची दहिसर मिठागर या ठिकाणी पाठवायचे धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना देखील समजत आहे की, नागरी सुविधांवर ताण पडणार आहे. आत्ताच निविदाप्रमाणे किंवा निविदाबाह्य सवलतीप्रमाणे धारावीचा विकास करण्याचा ठरवलं. तर, मुंबईकरांवरती मुंबईच्या नागरी सुविधांवरती मोठा भार पडेल जर कॅल्क्युलेशन केलं तर हजारो एकर जमीन ही आजच आदानींना दिलेली आहे त्याच्यात असे आदेश निघालेले आहेत, सरकारचा हा डाव हाणून पाडू” असंही उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.
वचननाम्यातल्या प्रमुख तरतुदी काय?
१) प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
२) २०३५ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. पुढच्या ११ वर्षात महाराष्ट्राचा प्राचीन, मध्यमयुगीन आणि आधुनिक इतिहास तसंच प्रगतीशील आणि पुरोगामी संस्कृतीचं दर्शन घडवणारी लेणी उभारणार.
३) शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.
४) महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार.
५) प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४x७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार.
६) अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
७) प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार
८) जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार
९)सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
१०) ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
११) वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
१२) धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.
१३) मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.
१४) बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार. निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.
१५) मुंबईतल्या रेसकोर्सच्या जागेवर कुठलंही अतिरिक्त बांधकाम होऊ न देता ती जागा मुंबईकरांसाठीच मोकळी ठेवणार
या प्रमुख तरतुदी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वचननाम्यात दिल्या आहेत. तसंच महाविकास आघाडीच सरकारच येईल. आम्हाला लोक कौल देतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.