शरद पवारांचा झंझावात महायुतीला जड जाणार..? विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ४५ मतदारसंघात घेणार ५६ सभा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील २८८ मतदारसंघात आमदार निवडून देण्यासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काल निवडणुकीतून माघार घेण्याची शेवटची तारीख निघून गेल्यानंतर आता राज्यातील लढती स्पष्ट झाल्या आहेत.
यादरम्यान निवडणूक प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे देखील दंड थोपटून मैदानात उतरले आहेत.
विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शरद पवार तब्बल ५६ जाहीर सभा घेणार आहेत. विधानसभेसाठी मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार असल्याने येत्या दोन आठवड्यात शरद पवारांच्या राज्यभरातील ४५ मतदारसंघात ५६ सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. या कालावधीत पवार दररोज अंदाजे चार चे पाच सभा घेणार आहेत.
शरद पवार यांनी आज बारामती मतदारसंघातून झंझावाती प्रचार दौरा सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गाव भेटीदरम्यान पवार तब्बल ८ सभा घेणार आहेत. उद्या मुंबईत राहुल गांधीच्यासभेतही शरद पवार उपस्थित असणार आहेत, तर परवा नागपूरनंतर खानदेश असा पवारांचा प्रचाराचा कार्यक्रम असणार आहे.
लोकसभेत चांगला प्रतिसाद
लोकसभा निवडणुकीवेळी देखील शरद पवारांनी ८० पेक्षा जास्त प्रचार सभा घेऊन १० पैकी ८ खासदार निवडून आणले होते. आता देखील शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. या प्रचार मोहिमेतून शरद पवार किती मतदारांना स्वतःकडे खेचून आणणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान शरद पवारांनी आज बारामती यथे झालेल्या सभेत १८ तारखेला शेवटची सभा बारामती मध्ये घ्यायला येईल, असं जाहीर केलं आहे. यासोबतच उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि माझी उद्या मुंबईत सभा आहे. त्यानंतर मी नागपूर मध्ये जाईल आणि तिथून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि शेवटी बारामती मध्ये येईल असेही पवार म्हणाले. राज्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. सगळीकडे येणं शक्य नाही, जेवढं जायला लागेल तिकडे जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.