आमदारकीसाठी शेट्टींनी स्वाभिमान विकला : शिवाजी माने अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ज्या बारामतीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला त्याच बारामतीत आमदारकीसाठी त्यांना शरण जावे लागले. शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची त्यांनी चेष्टा केला असल्याचा घणाघाती आरोप जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
आजपर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला घामाचा दाम मिळावा, यासाठी गावागावात संघर्ष केला. अनेक ठिकाणी साखर सम्राटांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली. खोटे गुन्हे दाखल केले. हे कार्यकर्ते आजही कोर्टाच्या चकरा मारत आहेत.ज्या राष्ट्रवादी बरोबर आज पर्यंत स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संघर्ष केला त्याच पक्षाच्या नेत्यांच्या दारात पदासाठी राजू शेट्टीं सारख्या माणसाला जावं लागणं. ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची शोकांतिका असल्याची टीकाही पत्रकात केली आहे.
आमदारकी घ्यायची होती तर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा विचार करता आला असता. स्वाभिमानीकडे डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे अशी बिनीचे शिलेदार होते. चळवळ वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग झाला असता, परंतु केवळ सत्ता आणि सत्ता याच्याच मागे लागलेल्या शेट्टी यांना कार्यकर्त्याचा कोणतेच सोयरसुतक नाही, यामुळेच त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा घात करून गोविंद बागेत आमदारकी स्वीकारली आहे.
सर्वसामान्य शेतकरी व चळवळीसाठी मार खाल्लेला कार्यकर्ता हे कधीही विसरणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला जाऊन शेट्टींनी चळवळ मोडण्याचे पाप केले आहे. भविष्यात त्यांना शेतकरी आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर जय शिवरायचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, तालुकाध्यक्ष गब्बर पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष बंडा पाटील, मार्गदर्शक सदाशिव कुलकर्णी, कृष्णकांत रेंगडे, बाजीराव पाटील, दत्ता शिंदे, भाऊ पाटील, रामदास वड्ड, उत्तम पाटील, संतोष पाटील, दत्ता पाटील, मल्हारी भांडवले यांच्या सह्या आहेत.