विधान परिषद निवडणूक राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग? जिल्ह्यातुन कोणाची वर्णी?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रितेश पुरोहित
यवतमाळ
महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.
याआधी, राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करुनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल निर्देशित उमेदवार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. दोन रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली शिफारस मंत्रिमंडळाकडून नसल्याचे कारण देत आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्याचे सांगत राज्यपालांनी नकार दिला होता.
रिक्त जागी बिनविरोध निवडणूक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 मे रोजी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंची विधिमंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागल्यामुळे राज्यावर घोंगावणारे राजकीय संकट दूर झाले आहे. शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1, तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत.
जिल्ह्यातून काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे,शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके यांनी पुन्हा राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळावी म्हणून दिल्ली हायकमांड कडे फिल्डिंग लावली असून जिल्ह्यात याअगोदर काँग्रेसचे हरिभाऊ राठोड व माणिकराव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार होते मागील विधान परिषदेमध्ये वर्णी लागली नसल्यामुळे या वेळेस तरी या तीन माजी मंत्र्यांपैकी कोणाची वर्णी लागते? की पुन्हा जिल्ह्याला विधान परिषदेमध्ये डच्चू मिळतो हे लवकरच समजेल. एकंदरीतच काँग्रेसच्या तीनही माजी मंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपणास आमदार की मिळावी म्हणून फिल्डिंग लावल्याची चर्चा जिल्हाभर होत आहे.