ज्या मतदारसंघात शिवसैनिकांनी तब्बल पंचवीस वर्ष गड राखला, त्याच यवतमाळ-वाशिम लोकसभा मदारसंघाचा उमेदवार ठरेना…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- लोकसभा निवडणुकांचं बिगुल केव्हाच वाजलं असून आजपासून लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची अधिसुचना जारी केली जाणार आहे.
असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेली महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. अशातच ज्या मतदारसंघाने गेली 25 वर्ष आपला शिवसेनेचा गड राखला त्याच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिकरीचे जात आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित झाला आहे.
25 वर्ष गड राखला, तरी उमेदवार ठरता ठरेना!
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, अजूनही एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. या ठिकाणी सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांच्या नावावर भाजप अनुकूल नसल्याने नवीन उमेदवार शिंदे यांना शोधावा लागत आहे का, अशी शक्यता देखील या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे. आज शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशातच या यादीत भावना गवळी यांच्या नावाची वर्णी लागते का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त
महायुतीतील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या मतदारसंघात शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपला दावा वेळोवेळी बोलून दाखवला आहे. तसेच त्यांनी गेली 25 वर्ष शिवसेनेचा हा गड एकहाती राखला आहे. त्यामुळे सध्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक चर्चाना उत आला आहे. खासदार भावना गवळी या सतत पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले असे असतानाही उमेदवारी घोषित करण्यासाठी इतका उशीर आणि आश्वासित का केला जात नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलून दाखवला आहे.
भावना गवळी यांच्या नावाची वर्णी लागणार?
नुकतीच भावना गवळी यांच्या समर्थक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुंबई गाठत वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी या देखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करत कामाला लागण्याची आदेश दिले. यावरून भावना गवळी यांना उमेदवारी मिळणार असल्याची स्पष्ट झाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलंय. अशातच शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या यादीत आता भावना गवळी यांच्या नावाचा समावेश असतो, की अन्य कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.