माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ‘कोरोनामुक्त’; रुग्णालयातून डिस्चार्ज
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पुढील १४ दिवस चव्हाण यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते.
नांदेड येथे त्यांच्या स्वॅबच्या तपासणी अहवालानंतर चव्हाण यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना २५ मे रोजी उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते.
मुंबईहून नांदेडला आल्यानंतर २४ मे रोजी त्यांना कोरोनाचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ आरोग्य यंत्रणेला सांगून स्वॅब तपासणीसाठी दिला.नांदेडचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायम जिल्हा प्रशासना सोबत बैठका घेत होते. शिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरून लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या अनेक गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा व दैनंदिन गरजेच्या वस्तुंचे किट वाटण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूकीसाठी ते तातडीने विमानाने मुंबईला गेले होते. या शिवाय राज्य मंत्रीमंडळाच्या महत्वाच्या बैठकांना देखील ते हजर रहायचे.
रुग्णालयात उपचार घेत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वडेरा यांनी सुरू केलेल्या ‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेत अशोक चव्हाण यांनी सहभाग नोंदवला. देशातील कोट्यावधी जनतेचा आवाज बुलंद करण्याच्या मोहिमेत कोरोनाचा मुकाबला करत असताना मी या मोहिमेत सहभागी होत असल्याचे अशोक चव्हाण यांनी त्यावेळी सांगितले होते