शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राला काय दिले..? अमित शहा यांचा सवाल ; जनतेला जाब विचारण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “केंद्रात शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे सत्तेत होते. त्या काळात त्यांनी महाराष्ट्राला केवळ एक लाख ९१ हजार कोटी रुपये दिले. मोदी सरकारही २०१४ ते २०२४ पर्यंत दहा वर्षे सत्तेत आहे.
त्या काळात मोदी सरकारने महाराष्ट्राला दहा लाख १५ हजार ८९० कोटी रुपये दिले. त्यामुळे भाजपने नव्हे, तर काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनाही महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. त्यांना जनतेने जाब विचारावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ विंग येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणात जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. उमेदवार भोसले, खासदार उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
शरद पवार व त्यांच्या कंपनीने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे, असा आरोप करत शहा म्हणाले, ”त्यांच्या काळात काहीही कामे झाली नाहीत. मात्र, राज्यात विकासाचा वेग महायुतीचे सरकार आल्यानंतर सुरू झाला.
राज्यात विकासकेंद्रित काम करण्यास महायुती कटिबद्ध आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीची सत्ता अबाधित राहील. त्या सत्तेत अतुल भोसले आमदार म्हणून असतील, याचा मला विश्वास आहे. तुम्ही त्यांना आमदार करा, त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे काम आम्ही करू. मागील निवडणुकीत मी येथे आलो होतो.
त्यावेळी तुमच्याकडून झालेली चूक सुधारण्याची वेळ यावेळी मिळाली आहे. केवळ साडेचार हजार मते मिळाली असती, तर अतुल भोसले आमदार झाले असते. त्यामुळे यावेळी एकमुखी निर्णय घेऊन त्यांना आमदार करा. कऱ्हाड दक्षिणेत तुमच्या एमआयडीसीत राष्ट्रीय स्तरावरचा मोठा प्रकल्प देण्याची व कऱ्हाडच्या विकासाला हातभार लावण्याचा माझा शब्द मी खरा करून दाखवतो.”
शहा म्हणाले, ”काश्मीरमधून ३७० कलम आम्ही
हटवले. मात्र, तेथे काँग्रेसप्रणित सत्ता येताच ३७० कलम परत आणण्यास विधानसभेत ठराव झाला. मात्र, राहुल गांधी यांच्या चार पिढ्या जरी सत्तेत आल्या तरी काश्मीरमध्ये ३७० कलम आम्ही लागू होऊ देणार नाही. जम्मूमध्ये यांचे सरकार येताच कलम लागू करण्याचा ठराव केला असला, तरी
त्यांचा तो निर्णय आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. काश्मीर व जम्मूत काँग्रेसच्या काळात दहशतवाद फोफावला होता. मात्र, भाजपच्या काळात तो प्रयत्नही झाला. मात्र, आम्ही पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिले आहे. त्याचेही पुरावे काँग्रेस मागत होती, यापेक्षा दुर्दैव नाही. त्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांचे चेहरे जरी पाहिले असते, तरी त्यांना त्याची योग्य
उत्तरे मिळाली असती. त्यामुळे आमचा जीव गेला, तरी चालेल. मात्र, पाकिस्तानधार्जिणा एकही निर्णय आम्ही होऊ देणार नाही.”
अमित शहा म्हणाले….
काँग्रेस व राहुल गांधी खोट बोलणारी फॅक्टरी आहे त्यांचे लष्करासहीत अग्निवीरबाबत खोटे आरोप
अग्निवीर हा लष्कराला युवा करण्याचा कार्यक्रम
अग्निवीरमधून निवृत्त होणाऱ्या जवानाला केंद्राच्या सीएसईएफ व राज्य सरकारच्या पेन्शन देणाऱ्या नोकऱ्यांत संधी उपलब्ध करून देऊ
भाजपचा वादा म्हणजे काळ्या दगडावरील लकीर
वादा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत
काँग्रेसला वन रॅंक वन पेन्शनचा निर्णय ७५ वर्षे घेता आला नाही
मात्र मोदी सरकार आल्यानंतर तो निर्णय घेत जवानांचा आदर केला