फडणवीसांकडे गाऱ्हाणे मांडणाऱ्या पोलिस हवालदाराची बदली ; बदली रद्द करण्याची फडणवीस यांची मुख्यमंत्री यांस विनंती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोलिसांना सुविधा मिळत नाहीत, असे गाऱ्हाणे मांडणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील पोलिस हवालदार संजय घुले यांना शिक्षा म्हणून केलेली बदली तत्काळ रद्द करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोरोनाशी लढताना आपल्या पोलिस दलातील कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजवित आहेत. कोरोनाशी लढताना आतापर्यंत राज्यातील सुमारे 2300 हून अधिक पोलिस कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे.
मुंबई ते नागपूर असा परतीचा प्रवास करताना 17 मे रोजी वाशीम जिल्ह्यातील जऊळका पोलिस स्थानक, किन्हीराजा पोलिस दलातील हवालदार संजय घुले यांची मार्गात भेट झाली होती. त्यांची विचारपूस केली असता, सॅनिटायझर किंवा मास्क यापैकी कोणत्याही प्राथमिक सुविधा त्यांना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कुणीतरी या घटनेचा व्हीडियो काढून व्हायरल केला.
त्यानंतर 28 मे रोजी राज्याचे गृहमंत्री वाशीम जिल्ह्यात येऊन गेले असता, त्याचदिवशी पोलिस अधीक्षकांनी त्यांची किन्हीराजा येथून वाशीम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या धनज येथे बदली केली. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बदलीचे ठिकाण हे सुमारे 140 किलोमीटर अंतरावर आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणाऱ्या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलिस दलात संतापाची भावना आहे, असे फडणवीस म्हणाले.
पत्रात ते म्हणतात की, पोलिसांना प्राथमिक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. मध्यंतरी नागपूर उच्च न्यायालयात एका प्रकरणात नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात नागपूर शहरातील 7000 पोलिसांना 780 मास्क, 5 पीपीई किट, 14 एन 95 मास्क आणि 21 सॅनिटायझर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले होते.
एका शहराची ही अवस्था असताना अशाप्रकारच्या काळात अशा शिक्षा देणाऱ्या बदल्या केल्या जाणार असतील, तर ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे ही बदली तत्काळ रद्द करावी आणि संजय घुले यांना त्यांच्या मूळ जागी पुन्हा काम करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..