महाराष्ट्र, गुजरातला वादळाचा धोका ; मुसळधार पावसाची शक्यता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पश्चिम बंगाल आणि ओडिशाला नुकताच अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसला. यात पश्चिम बंगालचे जास्त नुकसान झाले. या घटनेला २ आठवडे होण्याच्या आत अरबी समुद्रात दोन वादळांची निर्मिती सुरू झाली आहे. यापैकी एका वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या संदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात दोन वादळांची निर्मिती
अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ३ जूनपर्यंत (बुधवार) महाराष्ट्र आणि गुजरातला वादळाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अरबी समुद्रात दोन वादळांच्या निर्मितीची माहिती दिली आहे.यापैकी एक वादळ आफ्रिकेच्या तटावरुन ओमानमार्गे पुढे येमेनच्या दिशेने सरकणार आहे. तर दुसरे वादळ थेट भारताच्या दिशेने सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातला बसण्याची शक्यता आहे. वादळाविषयी आणखी अचूक अंदाज १ जूनपर्यंत देता येईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याआधी पश्चिम बंगाल आणि ओडिशाला अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसला.
अम्फान चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा
अम्फानमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ठिकठिकाणी पाणी साचले. झाडे उन्मळून पडणे, दिव्यांचे खांब पडणे, कच्चे बांधकाम पडणे अशा स्वरुपात चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाला मोठा फटका बसला. अम्फानच्या तडाख्याने ८०पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आणि लाखो नागरिक बेघर झाले. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली. या संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपये आणि ओडिशाला ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. याव्यतिरिक्त सरकारच्या वेगवेगळ्या कोषांमधून स्वतंत्रपणे पश्चिम बंगाल आणि ओडिशाला आर्थिक, धान्य, वैद्यकीय मदत अशा वेगवेगळ्या स्वरुपाची मदत देण्यात आली.
कोरोना पाठोपाठ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वादळाचे संकट
देशात सर्वाधिक 6कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या ३४,८९० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गुजरातमध्ये ६,१०६ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. या कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरातमध्ये प्रयत्न सुरू असतानाच वादळाचे संकट घोंगावू लागले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार परस्पर समन्वयातून काम करत आहेत. सरकारी यंत्रणेचे अरबी समुद्रातील घडामोडींवर लक्ष आहे. पुढील २४ तासांत परिस्थिती बघून आवश्यक ते उपाय केले जातील, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
महाराष्ट्र, गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
वादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये २ आणि ३ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. वादळ किनाऱ्याच्या दिशेने सरकू लागल्यावर पावसाचा जोर वाढेल. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोळी बांधवांना मासेमारी टाळा, आपापल्या बोटींचे रक्षण करा अशा स्वरुपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.