राज्य सरकारही पॅकेज जाहीर करणार : अजित पवार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे, त्यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठक घेण्यात येईल. या पॅकेजच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे केली.
पिंपरी-चिंचवडमधील औंध-रावेत येथील पुलाचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वरील घोषणा केली. कार्यक्रमासाठी जमलेले पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
कोरोनाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.त्यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कोण म्हणतंय या पॅकेजमध्ये नुसतेच मोठमोठे आकडे आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला या पॅकेजमधील काय मिळणार, असा सवाल आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री ज्याची चूल पेटते, अशा गरजू लोकांना आर्थिक आधार देण्याची गरज आहे, तसा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वास पवार यांनी या वेळी व्यक्त केला.
शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे, त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग बळावण्याची भीतीही अजित पवार यांनी व्यक्त केली. पण, काळजी घेतली, तर घाबरण्याचे काहीही कारण नाही. प्रत्येकाने दक्षता घ्यायला हवी, असे पवार म्हणाले.
ते म्हणाले, की महाराष्ट्रातील कामगार, मजूर हे कोरोनाच्या भीतीमुळे त्यांच्या त्यांच्या राज्यात मूळगावी गेले आहेत. त्यांची परत येण्याची वाट पाहण्यापेक्षा राज्यातील तरुणांनी आता पुढे येण्याची गरज आहे. विशेषतः राज्याच्या मागास भागातील तरुणांनी यात सक्रीयपणे सहभाग दाखवावा, त्यांना कौशल्याधारित करण्याचे काम राज्य सरकार हाती घेईल. त्यातून राज्यातील बेकरी कमी होण्यास मदत होईल.
सद्य परिस्थितीवर कुणीही राजकारण करण्याची गरज नाही. कुणाला काय वाटते, ह्याची आम्हाला फिकीर नाही. कोरोनाच्या या संकटाच्या परिस्थितीतून जनता कशी बाहेर पडेल, ती सुरक्षित कशी राहील, याला आमचा अग्रक्रम असणार आहे. त्या दिशेने आमचे काम सुरू आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.
आगामी लॉकडाउन वाढवायचा का नाही, या बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकार राज्यांना देईल, अशी शक्यता वाटते. लोकभावनेचा आदर करून पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याबाबत सर्वांशी चर्चा केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.