सावधान! मध्यमहाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाडयामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. देशभरात सर्वांनाच मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा आहे. मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळात दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची दोन दिवसात कमी होणार आहे. मात्र त्यानंतर राज्यातील सर्वच भागात मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेने अवघा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे.आता मात्र, ही होरपळ थांबणार असून, 30 तसेच 31 मे पासून मध्यमहाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटामध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. 31 मे ते 4 जून दरम्यान अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.
या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान राज्यातील विदर्भासह मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्राच्या बहुतांश शहराचे कमाल तापमान 45 ते 46 अंशाच्या आसपास नोंदले गेले आहे. त्यामुळे कडक उन्हामुळे होरपळ चांगलीच वाढली आहे.