आक्रमक नाना रिंगणात, अनुभवी बाबा सभागृहात? काँग्रेसमध्ये खांदेपालट?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे.नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर आक्रमक नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत.
विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे कालच दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकलेली नाही. सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी सांभाळताना बाळासाहेब थोरात यांची तारांबळ होत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे काँग्रेसमधील अनुभवी चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही, शिवाय पक्षातही महत्त्वाची जबाबदारी सध्यातरी नाही. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसमध्ये या अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन, आक्रमक नाना पटोले यांना थेट मैदानात उतरवून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याची चिन्हं आहेत.
राहुल गांधींची भेट टळली
‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट टळली. ‘कोरोना’ संकटामुळे आपण पुढच्या वेळी भेट घेऊ, असा निरोप राहुल गांधी यांच्याकडून नाना पटोले यांना देण्यात आला.