महायुतीकडून सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल…! अशोक चव्हाण, मिलिंद देवरांसह प्रफुल्ल पटेलांनी मानले दिग्गजांचे आभार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आज महायुतीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसला ‘जय महाराष्ट्र’ करत नुकतेच भाजप पक्षात दाखल झालेले अशोक चव्हाण यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपच्या तीन उमेदवारांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपच्या तीन राज्यसभा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी विधीमंडळात दाखल झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महायुतीतील सर्व उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीतील सर्व उमेदवारांकडून अर्ज दाखल
भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वरिष्ठांचे आभार मानले. ‘हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पक्षासाठी एवढे वर्ष दिले, त्याचं हे पळ आहे. मला जेव्हा आमदारकीची उमेदवारी नाकारण्यात आली होती तेव्हा काही समाज लोक नाराज झाले होते मात्र आज ही नाराजगी दूर झाली आहे. माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे मी केंद्रीय मंत्री सगळ्या नेत्यांचे आभार मानते.’ अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. यासोबत स्त्रियांचे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहोचवू आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.
मिलिंद देवरा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
शिवसेना शिंदे गटाकडून आज मिलिंद देवरा यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी दिली, यामुळे शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेलांनीही भरला फॉर्म
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी आज राज्यसभेसाठी फॉर्म भरला आहे. मी या आधी देखील राज्यसभेवर होतो. राजकीय जीवनात असताना काही ना काही घडामोडी करावीच लागते. हा फॉर्म मी का भरलेला आहे, हे येणारा काळ स्पष्ट करेल. रिक्त झालेली जागा आमच्याकडेच राहणार आहे, असंही प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं आहे.
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना संधी
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेतृत्व आणि राज्यातील काँग्रेस आमदार महाविकास आघाडीतील नेते, प्रमुख यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी पुढे म्हटलं की, माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठविण्याची तयारी दर्शवली, यामुळे मी आभारी आहे. माझं जिंकणं निश्चित आहे, राज्यसभेत महाराष्ट्राच्या जनतेची व्यथा मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मी करेल, सर्वधर्म समभाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकशाहीमध्ये हार-जीत होत असते, विधान परिषदमध्ये मी हरलो, तरी पक्षाची निष्ठा सोडली नाही.