महाराष्ट्रात 11 जागांवर तोफा थंडावल्या ; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान मंगळवारी 7 मे रोजी होणार आहे, त्यामुळे या मतदानासाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होणार आहे.
या 11 जागांमध्ये देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीचाही समावेश आहे. 7 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीत दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
कुठे होणार मतदान?
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मतदान पार पडेल. बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, धाराशीव आणि लातूर या 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होईल.
दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
बारामती
देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे.
सोलापूर
सोलापूर मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्यात सामना होणार आहे. सोलापूर मतदारसंघात एकूण 20 लाख 19 हजार 119 मतदार आहेत, यात 10 लाख 41 हजार 470 पुरुष तर 9 लाख 88 हजार 450 मतदार आहेत.
सातारा
सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सांगली
सांगलीच्या जागेवरून महाविकासआघाडीमध्ये जोरदार वादावादी झाली होती, त्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील लढत आहेत. तर काँग्रेस नेते विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार आहेत.
माढा
माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपसोडून पुन्हा एकदा शरद पवारांची साथ दिली आहे. मोहिते पाटील कुटुंबाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले. शरद पवारांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट दिलं आहे.
कोल्हापूर
कोल्हापूरमधून महाविकासआघाडीकडून शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर लढणार आहेत. शिवसेनेने या मतदारसंघातून तत्कालीन खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली आहे.
हातकणंगले
हातकणंगले मतदारसंघातही तिरंगी लढत होणार आहे. शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना, शिवसेना ठाकरे पक्षाकडून सत्यजीत पाटील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी मैदानात आहेत.
रायगड
रायगड मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाकडून अनंत गिते यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याविरुद्ध होणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून विनायक राऊत रिंगणात आहेत.
धाराशीव
धाराशीव मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाने ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तिकीट दिलं आहे.
लातूर
लातूरमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होत आहे. भाजपने सुधाकर श्रुंगारे यांना तर काँग्रेसने शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली आहे.