मुख्यमंत्र्यांबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ; वणीची घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सध्या कोरोना विषाणूजन्य आजाराने जगभर थैमान घातले असताना याच कोरोनावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत असून सोशल मीडियावरून टीका टिपणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणे वणीतील दोघांना चांगलेच भोवले आहे. शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणुने सर्वांना जेरीस आणले आहे. त्यातही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 50 हजारावर पोचली आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. निवेदने देऊन, काळे झंडे व फलक घेऊन सरकारचा निषेध नोंदविला जात आहे. त्यामुळे राज्यात टीका टिपणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राज्यात सुरू असलेले हे लोन आता गाव पातळीवर येऊन पोहचले आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्ये शोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे.वणी येथील “वणी ग्रामीण समाचार’ या व्हॉट्स ऍप ग्रुपवर सतीश पिंपरे यांनी तर फेसबुक वर व्यावसायिक विवेक पांडे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. तालुकाप्रमुख रवी बोढेकर यांच्यासह शहरप्रमुख राजू तुराणकर, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रांत चचडा, महेश चौधरी, नरेंद्र ताजने, ललित लांजेवार, ऍड. अमोल बोरूले, प्रशांत बलकी, बंटी येरणे, अजिंक्य शेंडे, आदेश कोंगरे यांनी पोलीस ठाणे गाठून या दोघांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे वणीतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाही झाली पाहीजे. अन्यथा शिवसेना आपली पुढील दिशा ठरवेल
विश्वास नांदेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार.