महामार्गातील अडथळे, ओलिताची जमीन दाखवली पडित केंद्रीय मंत्र्यांची दिशाभूल
रितेश पुरोहित ९४२३७०३८३१
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गातील
महागाव पासून यवतमाळ पर्यंत अनेक अडथळे काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित पाहायला मिळत आहेत .महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील वळण रस्ता मानव निर्मितीचे संकट रस्ता पूर्णत्वाच्या तोंडावर येऊन उभे ठाकले आहे.
हिवरा संगम रस्त्याच्या कामातील अडथळा गेल्या दोन वर्षापासून तसाच रेंगाळलेला आहे प्रशासकीय यंत्रणा आणि सर्वे करणाऱ्या हैदराबाद येथील खाजगी कंपनीने येथील तिढा निर्माण करून ठेवलेला आहे. आरवी असोसिएट हैदराबाद या सर्वे करणाऱ्या खाजगी कंपनीने हिवरा संगम येथील रस्ता करताना केंद्रीय रस्ते विभागाला तीन प्रस्ताव सादर केले आहेत एक अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरून रस्ता तयार करतो म्हटले तर त्याची लांबी २.४ किलोमीटर दर्शवण्यात आली असून त्यावर होणारा अंदाजित खर्च ४९ कोटी ६० लाख रुपये दर्शविण्यात आला आहे. दुसरा दक्षिणेकडून नदीवर फुल टाकून तयार करतो म्हटले तर २.५ किलोमीटर त्यावर येणारा खर्च ५३ कोटी ७५ लाख रुपये दर्शविण्यात आला आहे तसेच पर्यायी बायपास मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून त्याची लांबी एक किलोमीटर पडणार आहे. त्यावर २४ कोटी चा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
बायपास रस्ता तयार करण्यासाठी सर्वे करणाऱ्या खाजगी कंपनीने सुरुवातीपासूनच केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाची दिशाभूल केली असून ओलिताच्या जमिनी पडीत असल्याचे दर्शवले आहे या जमिनीमधून बायपास रस्ता करण्यात आल्यास त्यावर होणारा खर्च पर्यायी रस्त्याच्या तुलनेत अतिशय कमी दर्शविण्यात आला आहे बायपास रस्त्यावरील शेतकऱ्यांनी याला विरोध केला असून न्यायालयामध्ये रिट पिटीशन दाखल केले आहे हिवरा संगम येथील बायपास रस्त्याचा वाद न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्यामुळे दरम्यान चे काम थांबलेली आहे. थांबलेल्या कामामुळे व शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी चौकशीचे निर्देश दिले होते चौकशी अधिकाऱ्यांनी सर्वे करणाऱ्या खाजगी कंपनीच्या अहवालाचा कित्ता गिरवत जमिनी पडीत असल्याचे दाखवले आहे त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
आरवी असोसिएट हैदराबाद ही खाजगी कंपनी नेमका कोणाच्या इशाऱ्यावरून काम करू लागली आहे असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थीत केला आहे . ओलिताच्या जमिनी असून त्यामध्ये ओलिताची पिके उभी असताना ही जमीन पडीत असल्याचे दर्शवून जो अहवाल तयार करण्यात आला तो कसा बनावट आहे याची चिरफाड उमरखेड उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळ पंचनामा केल्यानंतर आपल्या अहवालात खाजगी कंपनीने केलेले सर्व दावे खोडून काढले आहेत.
हिवरा संगम येथून आहे त्याच रस्त्यावरून रस्ता तयार केला गेल्यास या रस्त्याच्या मध्ये येणारी पक्की बांधकामे अनाधिकृत लेआउट आणि अतिक्रमणधारकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच लॉबीने छुप्या मार्गाने बायपास चा मार्ग अवलंबिला असल्याचा आरोप न्यायालयामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षापासून येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही खाजगी कंपनी आणि प्रशासनातील वेळ काढू अधिकाऱ्यांच्या हातचलाखी मुळे हा रस्ता रखडलेला आहे. एकूणच आरवी असोसिएट हैदराबाद या कंपनीने जिल्ह्यामध्ये निर्माण केलेले बायपास त्याची प्रामाणिक चौकशी केल्यास अनेक अनियमितता उघडकीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.