‘तुम्हा सर्वांचे मनापासून आभार..!’ भाजपच्या मोठ्या विजयानंतर PM नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप सत्तेवर येत आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे.
दरम्यान, आजच्या निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट केली असून, त्यात जनतेचे आभार मानले आहेत. ‘जनतेला माझा प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे, हे सिद्ध होते. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू.’
ते पुढे म्हणाले की, ‘या निमित्ताने मी पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानतो. तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली, ते अतिशय कौतुकस्पद आहे. विकसित भारताचे ध्येय घेऊन आपण पुढे जात आहोत. आपल्याला थांबायचे नाही, खचून जायचे नाही तर भारताला विजयी करायचे आहे. आज आपण एकत्रितपणे या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे.
तेलंगणातील जनतेचेही आभार
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी तेलंगणातील जनतेचेही आभार मानले. ‘तेलंगणातील माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी खूप आभार. गेल्या काही वर्षांमध्ये तुमचा आम्हाला पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही मी कौतुक करतो,’ असे ट्विट त्यांनी केले.