यवतमाळ चे डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला ; ग्राहक आयोगाने ठोठावला लाखो रूपयांचा दंड…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- एका महिलेस गर्भधारणा झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत हयगय केल्याने अपंग अपत्य जन्माला आले. याप्रकरणी महिलेच्या पतीने ग्राहक मंचात येथील दोन डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली. ग्राहक आयोगाने या प्रकरणी येथील दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे.
यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश आहे.
आर्णी येथील श्रीकांत वसंतराव राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर २० सप्टेंबर रोजी आयोगाने दिलेल्या या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आर्णी येथील मनीषा श्रीकांत राठोड या गर्भवती असताना त्या यवतमाळ येथील डॉ. अर्चना वीरेंद्र राठोड यांच्याकडे उपचार घेत होत्या. डॉ. राठोड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी येथील डॉ. आशिषकुमार लोहिया यांच्या मंगलमूर्ती डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी केली. त्यावेळी मनीषा यांच्या पोटातील गर्भ सुस्थितीत असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यंग नसल्याची माहिती सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
प्रत्यक्षात मात्र प्रसूतीनंतर नवजात बाळाला दोन्ही हाताला प्रत्येकी चार बोटं होती. पायाला हाड नव्हते, तर पाय व पायाची बोटेही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे श्रीकांत राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेत तपासणीत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आणि सोनोग्राफी तज्ज्ञांची हयगय झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तक्रार दाखल केली.
यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये डॉ. अर्चना राठोड आणि डॉ. आशिषकुमार लोहिया यांनी उपचार आणि तपासणीत हयगय केल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने दोन्ही डॉक्टरांवर ठपका ठेवला. या प्रकरणी डॉ. अर्चना राठोड व डॉ. आशिषकुमार लोहिया यांनी तक्रारकर्ते श्रीकांत राठोड यांना प्रत्येकी २० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपये भरपाई द्यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे तीन हजार द्यावे, असा आदेश दिला आहे.
ग्राहक आयोगाच्या या आदेशाने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात न्याय मिळू शकतो, हा विश्वास नागरिकांना दिला आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….