श्रीकांत शिंदेंसह गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल ; रोहित पवारांनी दिला धोक्याचा इशारा…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपसोबत जाण्याची भूमिका रोहित पवारांनीच शरद पवारांसमोर मांडली होती, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी सुनील शेळके यांनी केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत.
मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून या क्षेत्रात भाजप आणि शिंदे गट यांच्यात वादाच्या ठिणग्या उडत आहेत. त्यातच कल्याण लोकसभा क्षेत्रावर सध्या भाजप दावा करत आहे. याविषयी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
खासदार डॉ. शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व खासदारांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असा अंदाज रोहित पवारांनी (Rohit Pawar) वर्तवत शिंदे गटाला सूचक इशारा देखील दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे कल्याण लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यावर दोन दिवस आले आहेत.
शुक्रवारी रात्री त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. वंडार पाटील यांच्या घरी गणपतीचे दर्शन घ्यायला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना कल्याण लोकसभा क्षेत्रावर भाजपच्या वतीने दावा केला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता शिंदे व भाजप गटाचे सूत जुळत नसल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील शिंदे गटावरील नाराजी उघड केली आहे.
भाजप आणि शिंदे गटातील बेबनाव विषयी विचारले असता त्यांनी, भाजप कल्याण लोकसभेची सीट मागून घेईल, नाहीतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल, असे वक्तव्य केले.
रोहित म्हणाले, भाजपची प्रवृत्ती हीच आहे, लोकनेत्याला जवळ करायचं आणि संपवायचं. भाजपचे स्वतःचे जे लोकनेते होते मुंडे साहेबांपासून फुणकर साहेबांपर्यंत, खडसे साहेबांपासून अनेक असे नेते आहेत ज्यांना स्वतःच्याच नेत्यांनी संपवलं राजकीय दृष्टिकोनातून. तसंच दुसऱ्या पक्षातून त्यांच्याकडे येतात त्यांनाही ते संपवतात.
इथे श्रीकांत शिंदे स्वतः खासदार आहेत. तिथेच भाजपा बैठका घेत. तेव्हा भाजपच्या मनात काय आहे, याचा काही प्रमाणात अंदाज आहे. एकतर भाजप ही सीट मागू शकतो. नाहीतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या सर्वच खासदारांना कमळावर ही निवडणूक लढवावी लागेल. पवार यांचे हे विधान एकप्रकारे शिंदे गटाला धोक्याचा इशारा देणारे आहे. यामुळे आता येत्या काळात शिंदे गट काय भूमिका घेते पहावे लागेल.
भाजपसोबत जाण्याची भूमिका रोहित पवारांनीच शरद पवारांसमोर मांडली होती, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी सुनील शेळके यांनी केला होता. याला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी सांगितलं की ‘सुनील शेळके आमचे मित्र आहेत, त्याचं वक्तव्य हास्यास्पद आहे. पूर्ण स्टेटमेन्ट मी ऐकीनं आणि यावर उत्तर देईन.’