खरे ‘महागद्दार’ तुम्हीच..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ”राजकारणात बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही धाडस करून निर्णय घेतला. पण विरोधक सतत आम्हाला खोके-खोके म्हणून हिणवता, आमदारांना गद्दार म्हणता, पण महाराष्ट्राचे खरे ‘महागद्दार’ तुम्हीच आहात,” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यावर विधानसभेत केली.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी करत ठाकरे गटावर शरसंधान साधले. ते म्हणाले, ”त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी, महाराष्ट्राच्या मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या जुन्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली.”
विरोधी पक्षांनी विधानसभा नियम २९२ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना लक्ष्य केले. ”आमच्याकडे खूप गोष्टी आहेत, त्या बोलता येतील, पण आम्ही संयम बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही असे कुणी समजू नये,” असा इशाराही त्यांनी ठाकरे गटाला दिला.
”आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि आमच्याकडेच ५० कोटी रुपये द्या म्हणून पत्र देता. खरा पक्ष आमचा, धनुष्यबाण आमचा, तरी शिवसेनेच्या बँक खात्यात असलेले ५० कोटी यांनी आमच्याकडे मागितले, माझ्याकडे हे पत्र आहे.
मी एका मिनिटाचाही विचार केला नाही, तत्काळ देऊन टाका म्हणून सांगितले. तुमची संपत्ती, मालमत्ता आम्हाला नको, बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आता हे पैसे कुठे गेले, कसे गेले ते पुढे बघा. त्यांचा फक्त पैशांवर डोळा आहे, त्यामुळे इतर लोकांनीही याचा विचार करावा,” अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
अधिवेशनात विरोधकांचा आत्मविश्वास कमी झाला, संख्येचा परिणाम होतो. आमच्याकडे १७० आमदार होते, अजित पवार आल्यानंतर २१५ वर आकडा पोचला, असे सांगत विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी चिमटे काढले.”गेले वर्षभर हे सरकार पडणार असे दररोज सांगितले जात आहे. आता मुख्यमंत्री बदलणार असे सांगितले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण माझ्या मागे का लागले आहेत माहीत नाही, माझ्या जिल्ह्यातीलच आहेत. पण, जाणार जाणार म्हटले की खुंटा मजबूत होतो,” असे सांगत मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
”कोरोनामध्ये लोक मरत होते, तेव्हा काही लोक पैसे कमावत होते. यात ज्यांनी गैरव्यवहार केला आहे, त्यांना बिलकूल सोडले जाणार नाही. त्यांनी किती आरडाओरडा केला तरी सत्य लपणार नाही, आम्ही कुणावरही आकसापोटी कारवाई करणार नाही. पण वस्तुस्थिती लोकांसमोर आल्यानंतर कुणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
विरोधकांचा सभात्याग
”मुख्यमंत्री महागाईवर बोलले नाहीत, विजेच्या दरवाढीवर बोलले नाहीत, गॅस सिलिंडरवर अनेक राज्य सरकार अंशदान देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या राज्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले,” असा आरोप करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सभात्याग केला.
हे सरकार कार्यकुशल आहे. आम्ही २४ तास काम करणारे आहोत, फेसबुक लाइव्ह आणि घरी बसून काम करणारे सरकार नाही. राज्यातील जनता विठ्ठल आहे आणि आम्ही विठ्ठलाच्या विकासाच्या वाटेवर राबणारे वारकरी आहोत.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..