विदर्भातील चार आमदार अजितदादांसोबत, तर देशमुख, शिंगणे यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत अजित पवार हे रविवारी शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जाण्यास विदर्भातील तीन आमदारांनी पसंती दिली.
तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले.
गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्री म्हणून शपथ घेतली. आत्राम हे यापूर्वीही आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे , यवतमाळ जिल्ह्यातील पुसद चे आमदार इंद्रनील नाईक यांनीही अजित पवार यांच्यासोबत जाण्याला पसंती दिली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या पाठबळामुळेच संबंधित दोन्ही आमदारांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शनिवारीच या दोन्ही आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ शपथपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.
काटोलचे आमदार असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख व सिंदखेड राजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री राजेंद्र सिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जात तब्बल १८ महिने तुरुंगवास भोगला होता. त्यावेळीही त्यांनी आपण अखेरपर्यंत शरद पवार यांच्या सोबतच राहू असे स्पष्ट केले होते. रविवारी अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही देशमुख आपल्या जुन्या भूमिकेवरच कायम राहिले.