टीम शिंदेमध्ये येणार नवे चेहरे, फडणवीसांची माहिती ; विस्तार याच महिन्यात….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून याच महिन्यामध्ये (जुलै) तो पार पडेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांनी विस्ताराची नेमकी तारीख मात्र गुलदस्तात ठेवली.
राज्यातील अनेक प्रश्न असतात त्यासंदर्भात केंद्रात पाठपुरावा करावा लागतो त्यामुळेच अनेकवेळा दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात असे फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, बीड दौऱ्यावर आले होते.
येथील चिकलठाणा विमानतळावर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. केंद्रीय मंत्रिमंडळात काही बदल होण्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ”केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराशी राज्याचा काही संबंध नाही.
तो विस्तार कधी होणार? हे आम्हालाही माहिती नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रस आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. जुलैत आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू हे विश्वासाने सांगतो.”
मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रक्रिया पूर्ण केली असून येत्या चार आठ दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
कोणाला डच्चू द्यायचा असेल किंवा कुणाला सामावून घ्यायचे असेल तर याचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे. केंद्रामध्ये देखील फेरबदल होणार असून तसे संकेत आम्हाला मिळाले आहेत. शिवसेनेच्या दोन नेत्यांना केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. ही महाराष्ट्रासाठी चांगली बाब आहे.
– संजय शिरसाट, शिवसेनेचे नेते
सत्तेत आल्यावर पहिल्यांदा औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. हे सर्वांना मान्य आहे पण शरद पवार यांना ते मान्य नाही. कोणी काही म्हणाले तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीही काढू शकत नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री