“डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी…”, तुषार भोसले यांचा गंभीर आरोप….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. काल शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सकाळच्या शपथविधीवेळी गुगलीवर आऊट केल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस विरूद्ध शरद पवार असा वाद चांगलाच रंगला आहे. शरद पवार यांनी २०१९ मध्ये भाजपची फिरकी घेतल्याचे काल मान्य केले.
दरम्यान तुषार भोसले म्हणाले, शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. माझा समज होता की ते एखादे वक्तव्य करताना ते खात्री करतात. पण काल माझा गैरसमज दूर झाला.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझे आडनाव भोसले नसल्याचे व्हायरल होत होते. माझ्या मनात याचा मास्टर माईंड कोण, याचा शोध होता. काल एकादशीच्या दिवशी याचा मास्टर माईंड शरद पवार असल्याचे समजले, असा आरोप तुषार भोसले यांनी केला आहे.
पवारांवर आरोप करताना तुषार भोसले म्हणाले, “आम्ही जे धार्मिक करू सुरू केले आहे. त्याला तुम्ही तात्विक विरोध करू शकत नाही, म्हणून तुमचे आवडते हे जातीचे शस्त्र तुम्ही काढले. मी आज पुरावे आणले आहे. शाळा सोडल्याचा दाखला आहे. यात स्पष्ट आहे की, भोसले माझे आडनाव आहे.”
“धर्म आणि जात मराठा. डंके की चोट पे, सांगतो मी मराठा आहे. आमच्याच गावचे चिरंजीव रणजित भोसले हे तुमच्या पक्षाचे स्थानिक नेते आहे. संपूर्ण आमडदे गाव हे एकाच कुळाचे, भोसले कुळाचे आहे,” असे तुषार भोसले यांनी सांगितले.
भोसले म्हणाले, आज मला आश्चर्य वाटतं की ज्येष्ठ नेते शरद पवार खोट्या माहितीनुसार आधारे कांगावा करत आहेत. तुम्हाला आव्हान देतो की, मी भोसले नसल्याचा एक तरी पुरावा द्या, नाहीतर माफी मागा. मी हे सगळे पुरावे सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवणार आहे.
पवार साहेब कितीही पुरोगामी पणाचा आव आणत असले, तरी ते जातीयवादी असल्याचे काल स्पष्ट झाले. आमच्या धार्मिक कार्याला ते धास्तावले असून, त्यांनी जातीपातीचे राजकारण सुरू केलं आहे, असा आरोप तुषार भोसले यांनी केला आहे.