“ठाकरे गटाचे उमेदवार आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढतील…?”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ठाकरे गटाला राष्ट्रवादीच चालवत असल्याचा आणि पक्षाचे निर्णय राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार घेत असल्याचा आरोप वारंवार केला जातो. तर एकनाथ शिंदे आणि समर्थकांनी राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो असा आरोप वारंवार केल्याचं दिसून आलं.
अशातच आता ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला गेलाय असं वक्तव्य भाजपच्या नेत्याने केलं आहे.
भाजपचे नेते नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
नितेश राणे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना एका वर्षात पुन्हा पक्ष बांधणी शक्य नाही. कारण तो त्यांचा पिंड नाही. त्यांना निवडणुकीसाठी चिन्हं भेटणार नाही. म्हणुन येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार आणि आमदार राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत अशी माझ्याकडे खात्रीलायक माहीती आहे.
तर हा प्रश्न संजय राऊत राष्ट्रवादीकडे घेऊन गेले आहेत. त्याबाबत त्यांनी बोलावं. म्हणुन जागावाटप करण्याची नाटकं सोडुन खरी माहीती त्यांनी सर्वांना द्यावी असंही नितेश राणे बोलताना म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी ठाकरे गट राष्ट्रवादीमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव दोन वेळा दिल्याचा दावा यावेळी राणे यांनी केला आहे.
खरी माहीती आज ना उद्या बाहेर येईल, माझ्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही राष्ट्रवादीत विलीन करावी असा प्रस्ताव दिला गेलाय, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसुन येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. अशात संजय राऊत यांनी आज सकाळी याबाबत ट्विट केलं आहे. राऊत यांच्या ट्विटवरूनही नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.