उत्पादन न आल्यामुळे एका शेतकऱ्याने केली आत्महत्या
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
वृत्तसंस्था – शेतात पिकांची लागवड करूनही पिकांचे उत्पादन न आल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे घडला. आनंदा पाडुंरंग दुधाळ (वय ४८) असे त्याचे नाव आहे.
यासंदर्भात मृत दुधाळ यांचे बंधू राजकुमार दुधाळ यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यास दिलेल्या माहितीनुसार मृत आनंदा दुधाळ काल सोमवारी रात्री शेतात होते. शेतातील वस्तीवर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास दिसून आले. दुधाळ कुटुंबीयांची पाटखळ येथे शेती आहे. परंतु अनेक वर्षांपासून पाण्याअभावी शेतात पिकांचे उत्पादन होत नाही. गेल्या वर्षीही आनंदा दुधाळ यांनी पिकांची लागवड केली होती.
परंतु शेती पावसावर अवलंबून असल्याने आणि पावसाने निराशाच केल्यामुळे पिकांचे उत्पादन होऊ शकले नाही. अगोदरपासून शेती नुकसानीत असल्यामुळे दुधाळ हे आर्थिक अडचणीतून बाहेर पडू शकत नव्हते. त्यातूनच त्यांना दारूचे व्यसन लागले. काल रात्री ते दारूच्या नशेतच शेतात गेले आणि पहाटे त्यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याचे त्यांचे बंधू राजकुमार दुधाळ यांनी सांगितले.