२० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार – नितीन गडकरी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर- शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून यावर्षी आमचा २० हजार महिलांना रोजगार देण्याचा हेतू असल्याची घोषणा सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या चार कतृर्त्ववान महिलांचा सत्कार गडकरींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. एमएसएमइचे संचालक पी. एम. पार्लेकर, टाइम्स समूहाचे सब ऑफिस हेड प्रसाद पुल्लीवार व महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांची प्रमुख उपस्थिती होती. शनिवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे शी फेस्टला प्रारंभ झाला. तनिष्क, एमएसएमई, मल्टिफिट नागपूर, डॉक्टर मोदी, नेशन नेक्स्ट आणि फोर्ड हे सहआयोजक असलेल्या या ‘शी फेस्ट’च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात एमएसएमईच्या निर्यातीसंबंधी कार्यशाळेने झाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त विनिता साहू यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला. ‘विमेन्स वेलनेस बाय डॉ. मोदी’ विषयावरील परिसंवादही पार पडला.
गडकरींनी आपल्या कार्याचा आढावा घेताना महिलादिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्योजिकांच्या कार्याचे त्यांनी कौतूक केले. सर्व बँकांच्या संचालकांशी संपर्क साधून उद्योजिकांना कर्ज देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पी. एम. पार्लेकर यांनी खासदार उद्योग महोत्सवाची माहिती दिली. त्याला पाच हजारहून अधिक लोक येणार असल्याचे ते म्हणाले. नागपुरात टेक्नॉलॉजी सेंटर उभारले जात आहे. त्यातून १५ हजारहून अधिक लोकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. गारमेंट, दालमिल इत्यादीचे क्लस्टर सुरू करण्यात आले आहे. त्याद्वारे ८०० महिलांना रोजगार मिळाल्याचे ते म्हणाले.