जिथं दादा जातील तिथं आम्ही… ; राष्ट्रवादीच्या आमदाराचा अजित पवारांना पाठिंबा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सध्या सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान राज्याच्या राजकीय वर्तुळात अजीत पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी आज दिवसभरातील आपला संपूर्ण दौरा रद्द केला यावरून हा चर्चेला चांगलेच उधाण आले.
राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चांना उधाण आलं आहे. यासह काही पक्षांच्या राजकीय नेत्यांकडून महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार अशी भाकीत वर्तवली जात आहेत. मात्र या संदर्भात राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
यादरम्यान राष्ट्रवादीचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी अजित पवार जिथे जातील तिकडे आम्ही जाणार अशी भूमिका जाहीर केली आहे. राज्याचे प्रश्न अजित पवार समर्थपणे सोडवू शकतात हे राज्याच्या जनतेला माहिती आहे, अजित पवार असे एकमेव नेते असल्याने त्यांना टार्गेट केलं जाऊ शकतं असेही कोकाटे म्हणाले आहेत.
आम्ही सर्व अजित दादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या बरोबरच आहोत, अद्याप कुठलाही तसा निर्णय झाला नाही. त्याच्यावरती बोलणं योग्य होणार नाही. पक्षात उगाच दोन प्रवाह का करावेत असे कोकाटे म्हणाले. परिस्थितीनुसार जो निर्णय होईल तसं आम्ही करू असेही कोकाटे यावेळी म्हणाले.
अजित पवारांसारख्या नेतृत्वाची भाजपला गरज
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. आमदार कोकाटे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आमदार कोकाटे म्हणतात भाजपला राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही. यासह भारतीय जनता पक्षाला अजितदादा पवार यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. यासह आमदार कोकाटे म्हणाले की, राष्ट्रवादी ही कोणाची संस्था नसून शरद पवार यांच्या मालकीचा पक्ष आहे. अजित दादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण संपत्ती आहे. आमदार कोकाटे यांच्या या वक्तव्याने राजकीय पटलावर काही वेगळी गणिते मांडली जात आहेत का याचा विचार केला जात आहे.
त्यात वावगं काय?
प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी त्यांना प्रभावी नेतृत्वाची गरज देखील असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनमानसात आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून आणण्यासाठी व महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला बळ देण्यासाठी अजित पवार यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे माझं मत आहे. भाजपकडे हा एकमेव पर्याय आहे.
प्रत्येक पक्षाला विजय मिळवण्यासाठी सक्षम नेतृत्व आपल्याकडे असावे असे वाटते, त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्यामुळे राज्यात सत्ता मिळवण्यासाठी यांची ताकद आहे त्यांना सोबत घेऊन लढण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर त्यात काही वावगं नाही. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस देखील असा प्रयत्न करू शकतो, असेही कोकाटे म्हणाले.