सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा..! परीक्षांचे नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) जाहीर केलं आहे.
आता या परीक्षा १६ ते २४ मे २०२५ या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.
पूर्वी जाहीर केलेल्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या
सीए परीक्षांचे मूळ वेळापत्रक ९ ते १४ मे दरम्यानचे होते. मात्र, काही भागांतील युद्धजन्य परिस्थिती आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आयसीएआयने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे देशभरातील हजारो परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवीन तारखांनुसार १६ ते २४ मेदरम्यान परीक्षा
आयसीएआयच्या अधिकृत घोषणेनुसार, आता पुढील परीक्षा १६ ते २४ मे या कालावधीत पार पडणार आहेत. यामध्ये सीए अंतिम, इंटरमीडिएट आणि आयएनटीटी-एटी (पीक्यूसी) या तीनही स्तरांच्या परीक्षांचा समावेश आहे.
युद्धविरामामुळे निर्माण झालेल्या स्थैर्यामुळेच या सुधारित तारखा निश्चित करण्यात आल्या असल्याचे ICAI ने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांनी ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे
परीक्षेच्या स्थळांमध्ये कोणतेही बदल झाले आहेत का, तसेच प्रवेशपत्र डाउनलोडची तारीख, परीक्षा केंद्राचे निर्देश यांसाठी विद्यार्थ्यांनी ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे भेट देणे आवश्यक आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत माहितीवर भर देण्याचे आवाहन ICAI ने केले आहे.