उद्धव ठाकरेंच्या लढ्यात काँग्रेस खंबीरपणे पाठिशी; वेणूगोपाल यांनी स्पष्टच सांगितले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- हुकूमशाहीच्या विरोधात लढाई सुरू आहे. उद्धव ठाकरे कसं लढत आहेत हे पाहत आहोत. ईडी , सीबीआयकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे.
इतरही पक्षांना टार्गेट करत आहेत. या सगळ्या लढाईत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे पाठिशी आहोत, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल राव यांनी म्हटले. आज ‘मातोश्री’वर वेणूगोपाल यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील काही दिवसात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले होते. त्यानंतर मविआतील प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आज, काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी नाना पटोले, संजय राउत, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, भाई जगताप उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि के.सी. वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
के.सी. वेणूगोपाल यांनी म्हटले की, सध्या राजकारणात जे काही सुरू आहे ते सर्वांना माहीत आहे. मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा संदेश घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे आलो आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची स्वतःची एक विचारसरणी आहे. पण सध्या संकट मोठे आहे, हुकूमशाही सोबत लढायचे आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनादेखील हुकूमशाहीसोबत लढत असल्याचे के.सी. वेणूगोपाल यांनी सांगितले. काँग्रेसला विरोधी पक्षांची एकजूट हवी आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, फक्त विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाचे समीकरण नाही. देशात विविध पक्ष आणि त्यांची विचारसरणी आहे. या पक्षांना एकत्रितपणे घेऊनसोबत जायचे आहे. त्याला लोकशाही म्हणतात. भाजप हाच एकमेव पक्ष राहील असे भाजपच्या अध्यक्षांनी म्हटले होते. ही भूमिका घातक आहे. शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे असेही उद्धव यांनी म्हटले. आम्ही मैत्री निभावतो तेव्हा संबंध जोडतो. भाजपसोबत 25 वर्ष युती होती. पण त्यांना मित्र कोण, शत्रू कोण हे कळलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला.