एकविसव्या शतकात भारतीय समाजात स्त्रियांची स्थिति
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
लेख – ८ मार्च च्या महिला दिनानिमित्त , भारताची अर्धी लोकसंख्या म्हणवणाऱ्या भारतीय समाजातील महिलांच्या बऱ्या-वाईट स्थितीचा आढावा घेण्यासाठी हा लेखप्रपंच.एकविसाव्या शतकात अंतराळवीर,वैज्ञानिक, नृत्य, गायन, लेखन, लोककला, क्रीडा, पत्रकारिता, वैमानिक, राजकारण, समाजकारण, लोकोपायलट, सैन्यदल, वैमानिक, आरोग्य सेवा, शिक्षण, नाट्य दिग्दर्शन, चित्रपट दिग्दर्शन, अभिनय, बँकिंग अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. ही सर्व क्षेत्रे महिलांसाठी खूप आव्हानात्मक मानली जायची. दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी, मेहनत, माता पित्यांचे भक्कम पाठबळ अशा सर्व घटकांच्या पाठबळावर महिलांनी खडतर आणि आव्हानात्मक असे यशोशिखर पादाक्रांत केले. या सर्व यशस्वी महिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन पुढील पिढी मार्गक्रमण करीत आहे.
खंत ही आहे की, यशोशिखर गाठणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प आहे.आजही मुलगा हवा म्हणून नवस करणारे आणि डॉक्टरांचे उंबरठे झिजविणारे अशिक्षित वा सुशिक्षित लोक आहेत. महिला भ्रूणहत्या विरोधी कायदा करूनही कायदेबाह्यरित्या गर्भलिंग परीक्षण केल्याच्या घटना समोर येतात. बेटी बाचाओ,बेटी पढाओ , सेव द गर्ल चाईल्ड हे नारे पुरोगामी म्हणवणाऱ्या भारतात द्यावे लागत आहेत.मुस्लिम समाजात “ट्रीपल तलाक’ सारख्या अन्यायकारक प्रथा आहेत.इतरही धर्मांत पहिली बायको असतांना तिच्याशी घटस्फोट नं घेता पुनर्विवाह करण्याचे प्रमाण फार आहे. “”माझ्या बायकोला मूलंच होत नाही. तिला मुलीच होतात.मुलगा होत नाही”’ म्हणून किंवा “”माझ्या पत्नीचे चारित्र्यच चांगले नाही अथवा हे मूलंच माझे नाही”’. अशा बिनबुडाच्या सबबी देऊन सर्रास दूसरा विवाह केले जातात.
अल्पभूधारक शेतकरी आपली शेती विकुन किंवा काही वर्षांकरिता मक्त्याने लावून स्वतः दुसऱ्याच्या शेतीवर मजूरी करून हुंडा व लग्नाची रक्कम गोळा करून मुलीचे लग्न करतो.अतिशय गरीब कुटुंबातील दोन ते तीन मूली दोन अपत्यांसह परित्यक्ता म्हणून महेरी परतलेल्या खेड़यातील घरोघरी सापडतिल. अगदी सामाजिक कार्याचा आव आणणारे, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे, शेतकरी आत्महत्येवर गळा काढणारे , भाषण झोडणारेसुद्धा त्याच शेतकऱ्याची लेक सून म्हणून त्यांच्या घरी आली तरीही तिला मान तर दूरच उलट अपमानितच करतात. ती कितीही शिक्षित वा कामसू का असेना, तिने माहेरून काहीही धन आणले नाही या मुद्द्यावरून तिची अवहेलना केली जाते,मानसिक छळ केला जातो. तिला मुलगा नाही झाला, मुलगी झाली तर ढोंगी सामाजिक कार्यकर्ते तिला तिच्या मुलीसकट एकटे पाडून हाकलून लावतात. उलट श्रीमंत घरच्या अशिक्षित, आळशी सुनांना मुलगा झाला म्हणून अक्षरशः डोक्यावर घेतले जाते. महत्त्वाची गोष्ट ही, की असा भेदभाव कुटुंबातील स्त्रियाच करतात.वेगळ्या दृष्टीने विचार केल्यास, यामागे समाजाची वैचारिक दुर्बलता किंवा दुबलेपणा कारणीभूत आहे. मुलीचे लग्न न झाल्यास समाज काय म्हणेल? मुलीला आधाराची गरज असते. ती बिना आधाराची (नवऱ्याविना) कशी काय जगेल? हे निरर्थक प्रश्न समाजमनाला पोखरतात. असे बुरसटलेले विचार महिलांच्या प्रगतीत अडथळा ठरतात.
आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान, कर्तबगार स्त्री पुरुषांसोबतच इतर स्त्रियांनाही खटकतात. स्त्री शिक्षण फक्त नोकरी मिळवून
अर्थार्जन करून नवऱ्याला आर्थिक मदत करण्याचा उद्देशानेच नवरा व सासरच्यांना अपेक्षित आहे.शिक्षित असूनही तिने नवऱ्याला प्रश्न विचारू नये, त्याच्या मर्जिनेच वागावे हा अलिखित नियम आहे. तो मोडला की, “”आजकालच्या मुली तोंडाल आहेत, त्या सासरी नांदत नाहीत” अशी ओरड केली जाते. विवाहित मुलींना किंवा विधवा सुनांना वडील किंवा नवरा यांच्याकडून वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेतून सहसा वाटा द्यायची आजही मानसिकता आढळत नाही. उलट त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता बळजबरीने हिस्कावली जाते. खेड्यापाड्यांत तर महिलेला चेटकीण ठरवून, अंधश्रद्धा पसरवून तिला ठार केले जाते. आपल्या हक्कासाठी लेकी -सुनांना खडतर न्यायालयीन लढा द्यावा लागतो.
लग्नाच्या पत्रिका वाटून झाल्यानंतर हुंडयाची मागणी वर पक्षाकडून केली जाते. हुंडा नं मिळाल्यास, लग्न तोडण्याची किंवा वरात घेऊन नं येण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकरणात मुलगी किंवा मुलीच्या आई वडिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घड़ल्या आहेत. यामागे कारण हेच आहे की, मुलीचे लग्न तुटले तर समाजात बदनामी होईल. तिचे दुसरीकडे लग्न होणार नाही, ही भिती होय. पोरनोग्राफी,सायबर क्राईम, ब्लॅकमेल, अपहरण, बलात्कार इत्यादी मार्गांनी महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. गरीब श्रीमंत सर्व वर्गातील महिलांवर बाबा बुवांच्या भोंदूगिरी मुळे अत्याचार झाले. मुलीने आई वडिलांच्या मर्जिविरूढ प्रेमविवाह केला तर तिच्याशी संबंध तरी तोडला जातो नाहीतर तिचे ऑनर किलिंग केले जाते. मुलाने मात्र बलात्कार वा खून का केला असेना,तेच आई वडील मुलाची जमानत घ्यायला पोलीस स्टेशन वा कोर्टची पायरी चढातात. पिडीत मुलगी अमुक वेळी,तमुक व्यक्ती सोबत तसे कपडे घालून गेली म्हणून तिच्यावर अत्याचार झाला,असे प्रश्न उपस्थित करून पोलीस,वकील व सामान्य जनताही पीडिता व तिच्या कुटुंबीयांचे वारंवार मानसिक उत्पिडन करते. मात्र, नंकळत्या वयाच्या मुलींचे शाळा, वसतिगृहे किंवा घरातील ओळखीच्या लोकांकडून उत्पिडन का होते? हे प्रस्न अनुत्तरितच राहतात. कायदे कमकुवत असल्याने त्याचा धाक उरलेला नाहीये.
या सर्व समस्यांमधून जेव्हा महिला वर्गाची सुटका होईल, यशस्वी महिलांची संख्या तुलनेने वाढेल, स्त्रीकर्तुत्वाला सन्मान मिळेल , स्त्रीशक्तीचा जागर केला जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने वर्षभर महिला दिन साजरा होईल.
स्वप्ना अनिल वानखडे