इंदू मिलमधील भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे काम केव्हा पूर्ण होणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आकाराला येत आहे.
मात्र या प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. राज्य सरकारच्या विशेष उपसमितीने गुरुवारी गाझियाबादमध्ये तयार केलेल्या पुतळय़ाच्या २५ फुटी प्रतिकृतीला हिरवा कंदील दाखविला असून आता राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळय़ाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरुवात झाली. करारानुसार स्मारक फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प वेग घेऊ शकलेला नाही. पुतळय़ाची उंची आणि प्रतिकृतीत अनेक बदल सुचविण्यात आले असून त्यानुसार पुतळय़ाला अंतिम रूप देऊन त्यास राज्य सरकारची मंजुरी घेणे आवश्यक आहे. ही प्रकिया रखडल्याने स्मारकाचे कामही संथगतीने सुरू आहे.
सामाजिक न्याय विभागाने पुतळय़ाच्या प्रतिकृतीला अंतिम रूप देण्यासाठी उपसमिती नेमली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांच्यासह १४ जणांचा त्यात समावेश आहे. या उपसमितीमधील सदस्य आणि एमएमआरडीएचे अधिकारी गुरुवारी गाझियाबादला गेले होते. ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार हा पुतळा घडविणार असून गाझियाबादमधील त्यांच्या कार्यशाळेत (स्टुडिओ) पुतळय़ाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या प्रतिकृतीची पाहणी या वेळी करण्यात आली. तर या प्रतिकृतीला उपसमितीने मंजुरी दिल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता ही उपसमिती यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. सरकारकडून पुतळय़ाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ पुतळय़ाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. महिन्याभरात पुतळय़ाच्या कामाला सुरुवात होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पाचे एकूण २७ टक्के काम पूर्ण
स्मारकाच्या कामाला २०१८ पासून सुरुवात झाली असून आतापर्यंत प्रकल्पाचे २७ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील पायाभूत इमारतीचे ५३ टक्के, तर पुतळय़ाचे १२ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता पुतळय़ाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मार्च २०२५ पर्यंत काम वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा
इंदू मिलमधील स्मारकात चबुतऱ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४५० फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. चबुतऱ्याची उंची १०० फूट असून पुतळय़ाची उंची ३५० फूट असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. मात्र अन्य महापुरुषांच्या पुतळय़ांच्या तुलनेत डॉ. आंबेडकर यांचा हा जगातील तिसरा उंच पुतळा असेल, असा दावा करण्यात आला आहे.