“रोहित वेमुला दलित नव्हता” ; पोलिसांनी बंद केली केस फाईल ; स्मृती इराणी , दत्तात्रेय यांना क्लीनचिट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हैदराबाद विद्यापीठातील दलित वर्गातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला यानं जानेवारी २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. त्याचा मृत्यू हा अॅकेडमिक मर्डर असल्याचे अनेक आरोप त्यावेळी झाले.
विद्यापीठीचे तत्कालीन कुलगुरु आणि भाजपच्या नेत्यांचं नाव या प्रकरणात आरोपी म्हणून पुढे आलं होतं.
पण तेलंगाणा पोलिसांनी आता रोहित दलितच नव्हता असा अहवाल देत ही केस बंद केली आहे. तसेच याद्वारे आरोपी माजी कुलगुरु आणि भाजप नेत्यांना क्लीनचीट दिली.
पोलिसांच्या तपासात म्हटलं की, रोहित वेमुला यानं आपली खरी जात समोर येईल या भीतीनं आत्महत्या केली आहे. कारण रोहित स्वतःला अनुसुचित जातीचा विद्यार्थी अर्थात दलित असल्याचं सांगत होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी सन २०१५ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून सांगितलं होतं की, हैदराबाद विद्यापीठात कशा पद्धतीनं जातीयवाद, मुलतत्ववाद आणि देशविरोधी राजकारण केलं जातं. या गंभीर आरोपांनी रोहितला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं बोललं गेलं.
दरम्यान, पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू अप्पा राव आणि सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी आमदार एन रामचंदर राव आणि ABVP नेत्यांसह भाजप नेत्यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.
पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं की, रोहित वेमुला अनुसूचित जाती (एससी) समुदायाशी संबंधित नव्हता. त्याच्या आईनं त्याला एससी प्रमाणपत्र मिळवून दिलं. आपली जात उघड होईल याची सततची भीती रोहितलाह होती. कारण जर रोहितची खरी जात उघड झाली तर त्यामुळं अनेक वर्षांमध्ये मिळवलेल्या आपल्या शैक्षणिक पदव्या गमावल्या लागतील आणि याविरोधात कोर्टात खटला चालेल, याची भीती त्याला होती.
त्याचबरोबर रोहित वेमुला हा अनेक समस्यांनी ग्रस्त होता, त्यामुळं तो नैराश्यात गेल्यानं स्वतःचं जीवन संपवण्याची शक्यता होती. तसेच आरोपींनी केलेल्या कृतींमुळं वेमुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडलेला नाही.
रोहितचा भाऊ पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान
दरम्यान, रोहित वेमुला याचा भाऊ राजा यांनी पोलिसांचे दावे खोडून काढले आहेत. तसेच पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत “पोलिस अधिकारी एखाद्या व्यक्तीची जात ठरवू शकत नाही. आम्ही शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहोत. आम्ही कोर्टात याविरोधात निषेध याचिका दाखल करू आणि न्यायासाठी इतर पर्यायांचाही विचार करत आहोत, असं म्हटलं आहे.