“झुकणार नाही, मागे हटणार नाही” म्हणत नवजोत सिंग सिद्धूंनी घेतली राहुल आणि प्रियंका गांधींची भेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- माजी क्रिकेटपटू काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी १० महिन्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधींची भेट घेतली. सिद्धू यांनी यानंतर या भेटीचा एक फोटोही ट्वीट केला आहे.
१० महिने तुरुंगात राहिल्यानंतर नवजोत सिंग सिद्धू यांची सुटका झाली त्यानंतर त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी फोटोही ट्वीट केला आहे.
काय म्हटलं आहे नवज्योत सिंग सिद्धू यांनी?
“आज दिल्लीत मी माझे गुरु राहुलजी आणि मित्र, मार्गदर्शक प्रियंका गांधी यांची भेट घेतली. तुम्ही मला तुरुंगात धाडू शकता, मला घाबरवू शकता, माझी बँक खाती गोठवू शकता पण पंजाबबाबत असलेली माझी निष्ठा कायम असेल. मी झुकणार नाही आणि एक इंचही मागे हटणार नाही” असा निर्धार नवजोत सिद्धू यांनी ट्वीटरच्या ओळींमध्ये व्यक्त केला आहे.
३४ वर्षांपूर्वीच्या एका घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणात नवजोत सिंग सिद्धू यांना तुरुंगात जावं लागलं होतं. या साठी त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र तुरुंगात चांगलं वर्तन ठेवल्याने सिद्धू यांना १० महिन्यात तुरुंगातून मुक्त करण्यात आलं.
वर्षभरात एकही सुट्टी घेतली नाही
सिद्धू यांनी आतापर्यंत ११ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. परंतु या काळात एकदाही त्यांनी पॅरोल सुट्टी घेतली नाही. अंमली पदार्थांची तस्करी करणे किंवा मोठ्या गुन्ह्यांमध्ये कैद असलेले गुन्हेगार वगळता इतर सर्व प्रकारच्या कैद्यांना कारागृहातील वर्तनाच्या आधारावर महिन्यातून चार ते पाच दिवसांची सूट दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही कैद्यांना लाभ मिळतो. परंतु सिद्धू यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. त्यामुळेच सिद्धू यांना काही दिवस आधीच तुरुंगातून मुक्त केलं जाणार आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असताना या काळात सिद्धू यांनी योगा आणि ध्यानधारणेवर लक्ष दिलं. या काळात सिद्धू यांनी त्यांची वजन ३४ किलोने कमी केलं आहे.