वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांना उपयोगी योजनांची निर्मिती व्हावी- वनमंत्री राठोड
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर – महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करावयाची असल्यास वन विभागानेही पुढाकार घेतला पाहिजे. वन विभागांतर्गत येणाऱ्या कृषी वानिकी योजनांवर भर देऊन त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविला पाहिजे, असे मत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. वनमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ते प्रथमच राज्याचे वन मुख्यालय असलेल्या वनभवन येथे शनिवारी दाखल झालेत. त्यावेळी त्यांनी वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
प्रधान मुख्य वनसंरक्षक- वनबल प्रमुख डॉ. एन. रामबाबू यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली. वनमंत्र्यांना यावेळी कमांड कंट्रोल रुमविषयी माहिती देण्यात आली. अर्थसंकल्प, नियोजन व विकास विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश यांनी वनविभागाच्या सर्व योजनांच्या आर्थिक बाबींचा आढावा घेणारे सादरीकरण केले. माहिती तंत्रज्ञान व धोरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांनी वनविभागाच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी सादरीकरण केले. ५० कोटी वृक्ष लागवडीच्या सर्व नोंदीची व जीआयएस प्रणालीची सविस्तर माहिती त्यांनी सादर केली.
वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांना उपयोगी योजनांची निर्मिती व्हावी, अशी सूचना वनमंत्री राठोड यांनी यावेळी केली. यावेळी प्रधानमुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, नितीन काकोडकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता, संजीव गौड, टी. के. चौबे, शैलेश टेंभूर्णीकर, पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रसंचालक रवीकिरण गोवेकर, माहीती अधिकारी स्नेहल पाटील उपस्थित होते. वनभवन येथील आढावा बैठकीनंतर सेमिनरी हिल्स येथील हायटेक नर्सरीलाही राठोड यांनी भेट दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..