ऑटो स्पेअर पार्ट्स तस्कर आरपीएफच्या जाळ्यात
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा पोलीसांनी २८ फेब्रुवारी रोजी भंडारा-रोड रेल्वे स्थानकावर ऑटो स्पेअर पार्ट्सची तस्करी करणार्या दोन आरोपींना पकडले. सनी बिरबल खुराना (३१) रा.रोहतक व गुरदीप अजित सिंग (१९) रा. फरीदाबाद असे त्यांची नावे आहेत.
रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. १ वर दुपारी ११.४५ वाजता गोडवाना एक्सप्रेस आल्यावर आरोपी काळा रंगाच्या चार मोठय़ा बॅग घेऊन फलाटाच्या विरुद्ध दिशेने उतरताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना आढळले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान त्यांच्याजवळील बॅग उघडून पाहिले असता आत मोठय़ा प्रमाणात ऑटो स्पेअर पार्ट्स असल्याचे आढळून आले. दरम्यान, या साहित्याबद्दल त्यांना विचारणा केली असता ऑटो पार्ट्सचा व्यवसाय करीत असून दिल्ली येथील करोलबाग येथून साहित्याची डिलीव्हरी देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. साहित्य संबंधित कोणतेही कागदपत्रांची त्यांच्याजवळ नव्हते. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याजवळील १ लाख ३५ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक विनेक मेश्राम, एस. एन. खान, ए. टेंभुर्णीकर, बी.सी. देशमुख, उत्तम कंगाले यांनी केली.