हिवाळी अधिवेशन – उपराजधानीला पोलीस छावणीचे स्वरूप, विधान भवनावर धडकणार 61 हून अधिक मोर्चे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला राज्याच्या उपराजधानीत 19 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्या (रविवार) सत्ताधारी पक्षाच्या वतीने विरोधकांना चहापानाला आमंत्रित करण्यात येते.
पण यंदा चहापानाऐवजी सरकारच्या वतीने ‘सुवर्णसंवाद’ हा शब्दप्रयोग करण्यात येणार आहे.
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे यंदा नागपूरमध्ये अभूतपूर्व गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मध्यंतरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सर्व विभागांचा आढावा घेतला होता. त्यावेळी बारकोड पद्धतीचा अवलंब करण्याचे सूतोवाच केले होते.
सरकारचा सुवर्णसंवाद
विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांसाठी चहापान आयोजित करण्यात येते. यंदा देशाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. विरोधकांनी सरकारसोबत संवाद साधावा यासाठी या अधिवेशनात राज्य सरकारने चहापान या पारंपरिक शब्दप्रयोगाऐवजी ‘सुवर्णसंवाद’ असे नामकरण केल्याची माहिती वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच पत्रकारांना दिली.
वाहतूक व्यवस्था कोलमडणार
या मोर्चामुळे संपूर्ण शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडतो. या वर्षी वाहतूक शाखेचे विशेष नियोजन नसल्यामुळे वाहतूककोंडी अटळ आहे असे सांगण्यात येते.
विधान भवनावर 61 हून अधिक मोर्चे
विविध मागण्यांसाठी यंदा 61 हून अधिक मोर्चे विधान भवनावर धडकणार आहेत. या अधिवेशनाच्या दरम्यान आंदोलन व मोर्चे काढणाऱया आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी दाभा परिसरात डिटेन्शन सेंटर तयार करण्यात आले आहे. विधान भवन, नाग भवन, आमदार निवास, रविभवन परिसर व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्धारे नजर ठेवण्यात येणार आहे.
पोलीस छावणीचे स्वरूप
अधिवेशनामुळे नागपूर विधान भवन व परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या सात तुकडय़ांचा समावेश आहे. त्याशिवाय आधुनिक सुविधा असलेली पाच सुसज्ज दक्षता वाहने, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, बारा बॉम्बशोधक-नाशक पथके तैनात केली आहेत. त्याशिवाय कमांडोचे विशेष पथकही सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱयानंतर लगेचच अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टय़ाही रद्द केल्या आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात येणाऱया प्रत्येक वाहनाची तपासणी होत आहे.