समृद्धीवरून सुसाट निघालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत केली.
Jalna मर्सिडीजमध्ये सुसाट निघालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला मात्र सामोरे जावे लागले.
जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावरून जात असतांना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. राज्यात सध्या सर्वत्र शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई सुरू आहे. या विरोधात व इतर मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीसांना काळे झेंडे दाखवत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जालन्यातील जामवाडी शिवारात पोहचला तेव्हा शेतकरी अचानक काळे झेंडे घेवून तिथे दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत महावितरणकडून असलेल्या कारवाईचा निषेध केला.
समृध्दी महामार्गावर शेतकरी व किसान काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी हे आंदोलन केले. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जात असून हे प्रकार थांबवावेत. केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करावे.
शिवाय महापुरूषांबाबत बेताल व्यतव्य करणाऱ्या सर्वांवरच कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून करण्यात आली. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, शेतकरी रतन शिंदे, असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन, जिल्हा सचिव गौतम लांडगे आदींचा आंदोलनात सहभाग होता.