बिनडोक लोकांना राज्यपाल का करता….? कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज देखील पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. ‘बिनडोक लोकांना राज्यपाल का करता?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधक राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक देण्याच्या तयारीत आहे. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मागे पण उत्तर दिलं होतं. राज्यपाल हे केवळ राज्यपाल नसतात, तर राष्ट्रपतींचे दूत असतात. सर्वोच्च न्यायालयात एक केस सुरू आहे की, निवडणूक आयोगाच्या नेमणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचप्रमाणे आता राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरविले गेले पाहिजे’.
‘राज्यपालपदावर दर्जाची लोक हवीत. केवळ माझा माणूस मग तो बिनडोक असेल तरी तो राज्यपाल म्हणून पाठवणार, असं चालणार नाही. त्यामुळे बिनडोक राज्यपाल चालणार नाही. बिनडोक लोकांना राज्यपाल का करता?, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.