राज्यात मुंबई, भिवंडी, मालेगाव, ठाणे गोवरचे हॉटस्पॉट ; १० हजार संशयित रुग्ण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी, ठाणे हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यात आतापर्यंत १० हजार २३४ गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ६५८ रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे. तर १३ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी, ठाणे हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी २५ नोव्हेंबरपर्यंत १० हजार २३४ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १०, भिवंडीत २ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १३ मृत्यूंपैकी ९ संशयित तर ४ निश्चित निदान झालेले मृत्यू आहेत. आतापर्यंत ६ मुलींचा तर ७ मुलांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हानिहाय गोवरचा प्रसार :
मुंबईत ३८३१ संशयित रुग्ण असून २६० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ७५७ संशयित रुग्ण असून ६२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ४४६ संशयित रुग्ण असून ४६ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ३०३ संशयित रुग्ण असून ४४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. ठाणे जिल्हा येथे ११७ संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई – विरार मनपा येथे १६७ संशयित रुग्ण असून ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १३१ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २१० संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.
गोवरच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क :
देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत.
६ महिन्यावरील बालकांना लस :
ज्या भागांमध्ये सहा महिने ते नऊ महिन्यापेक्षा लहान बाळांमध्ये गोवर रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा भागामध्ये सहा महिने ते नऊ महिन्यांहून लहान वयांच्या बाळांमध्ये गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी. या अधिकच्या मात्रेनंतरही या बालकांचे गोवर आणि रूबेला लसीकरण नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार करण्यात यावे.